अधिकाऱ्यांनी लपवला खराब रस्त्यांचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कोल्हापूर - शहरात नगरोत्थान योजना आणि महापालिकेच्या स्वनिधीतून केलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या रस्त्यापैकी सुमारे पाऊण कोटीचे खराब रस्ते ठेकेदारांनी जनतेच्या गळ्यात मारल्याचा तांत्रिक अहवाल वालचंद महाविद्यालय सांगलीच्या तांत्रिक समितीने दिला आहे. विशेष म्हणजे हा अहवालच वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोचू दिला नाही. महापालिकेची कामे करणारे काही विशिष्ट ठेकेदार, पवडी विभागातील वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी यांनी ठेकेदारांशी संगनमत करून जनतेची फसवणूक केल्याने या अधिकारी, ठेकेदारांवर फौजदारी करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

याबाबतचे लेखी निवेदनही शेटे यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खराब रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारांवर सोपविल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी या विषयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे; पण जबाबदारी सोडाच, खराब रस्त्यांची बिले घेऊन ठेकेदार आता नामानिराळे झाल्याचेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

कोल्हापूर महापालिकेने नगरोत्थान योजना आणि महापालिकेच्या स्वनिधीतून शहरातील सुमारे ३६ रस्ते केले आहेत. यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे; पण रस्ते करताना दर्जा घसरल्याने एका पावसातच रस्ते वाहून गेले आहेत. रेल्वेफाटक ते जनता बझार हा रस्ता तर पहिल्याच पावसात वाहून गेला होता. हे एक उदाहरण आहे; पण शहरातील अनेक रस्ते अशा पद्धतीने वाहून गेले. या प्रश्‍नावरून सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली होती. रस्त्याची कामे घेतलेल्या ठेकेदारावर तीन वर्षांसाठी या रस्त्यांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानंतर सभेत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संबंधित ठेकेदारांकडून रस्ते दुरुस्त करून घेतले जातील, असे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात जेवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. त्या तुलनेत दहा टक्केही रस्ते दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनीही फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी असल्याचे शेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या ठेकेदारांची कामे
अनिल पाटील, बबन पवार, उत्तम पाटील, गणेश खाडे, महेश भोसले, शिवपार्वती कन्स्ट्रक्‍शन, आनंद कन्स्ट्रक्‍शन आदी ठेकेदारांची ही कामे आहेत. या ठेकेदारांनीही महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Officials reported on the bad roads hidden