म्हाताऱ्या बसेस वाहतात प्रवाशांचे ओझे

म्हाताऱ्या बसेस वाहतात प्रवाशांचे ओझे

एसटीच्‍या निम्म्या गाड्या जुनाट - चालकांची होतेय कसरत; गर्दीच्‍या ठिकाणी जीव मुठीत

कोल्हापूर - एसटी महामंडळाची येथील विभागातील प्रवासी वाहतूक ९०० गाड्यांतून होते. त्यातील जवळपास निम्म्या गाड्यांची दहा लाख किलोमीटर वाहतुकीची क्षमता पूर्ण होऊन दोन ते पाच वर्षे उलटली आहेत.

अशा जुन्या गाड्यांची तात्पुरती डागडुजी करून पुन्हा चालविल्या जात आहेत. अशा गाड्या चालकांनी वापराव्यात, अशी अप्रत्यक्ष सक्तीच केली जात आहे. त्यातून हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लावून म्हाताऱ्या एसटीतून प्रवास घडतो आहे.

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागात रंकाळा - हुपरी या शटल सेवेच्या गाडीने बुधवारी ११ वाहनांना धडक देऊन दोघांचा मृत्यू झाला; तर ९ जण जखमी झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात गंभीर अपघात झाला, त्या बसगाडीची स्थिती काय आहे? या विषयी अपघाताला २४ तास उलटले तरी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे ‘ती गाडी सातारा विभागातून कोल्हापूरला पाठवली आहे’ यापलीकडे माहिती नाही. विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी ‘माहिती घेऊ’ अशी उत्तर दिली. 

या अपघातातील गाडीची दहा लाख किलोमीटर क्षमता पूर्ण झाल्याची चर्चा आहे. काही चालकांनी दिलेल्या माहितीनुसार एक एसटी दिवसाला किमान ७०० ते १००० किलोमीटरचा प्रवास करते. या गाड्या प्रवासादरम्यान काही आगारातील कार्यशाळेत थांबविल्या जातात. तिथे घाईगडबडीत त्यांची तांत्रिक तपासणी होते. पुन्हा गाडी मार्गस्थ होते. अशी सेवा वर्षानुवर्षे देत बहुतेक गाड्या जुन्या झाल्या आहेत. अशा गाड्यांतून दिवसाकाठी ५० हजार ते १ लाख प्रवासी वाहतूक करतात. यापैकी निम्म्या प्रवाशांचा जीव धोकादायक स्थितीतील गाडीतून होतो, हे भीषण वास्तव आहे.  चालकाला एका गाडीवर किमान सहा तास तसेच आठ ते बारा तास अशी अधिकृतरीत्या गाडी चालवावी लागते. यात ८ तासापेक्षा अधिक वेळ झाल्यास त्याला जादा कामाचा मोबदलाही दिला जातो. मात्र अनेकदा पुरेशी झोप झालेली नसल्याच्या अवस्थेत चालक गाडी चालवतात. तेव्हा अटीततटीच्या क्षणी जुन्या झालेल्या गाड्यांवर ताबा मिळवणे जिकिरीचे बनते. तेव्हा अपघाताची शक्‍यता वाढते.   

प्रत्येक गाडी महिन्यातून किमान दोन वेळा यंत्र कार्यशाळेत दुरुस्ती व ऑयलिंगसाठी आणली जाते. यावेळी दुसऱ्या जुन्या गाडीतील सुटे भाग दुरुस्त करून पुन्हा तेच नवीन गाडीला बसवून कशीबशी दुरुस्ती करून पुन्हा सेवेत आणली जाते. अशा कमकुवत गाड्या स्थानिक प्रवासी सेवेत वापरल्या जातात. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचा पश्‍चिम घाट मोठा आहे. त्यामुळे येथील बहुतेक प्रवास दुर्गम डोंगराळ घाट प्रदेशातून होतो. जुन्या गाड्या भार वाहताना मेटाकुटीला येतात.  

कोंडीचा प्रश्‍न सोडविण्याची गरज
कोल्हापुरात दुचाकी, चारचाकी रिक्षा, पादचारी अशी मोठी गर्दी सर्वच रस्त्यावर असते. गर्दीच्या मार्गावरून शहरातील विविध थांब्यांवर एसटीकडून प्रवासी घेतले जातात. त्यासाठी एका वेळी दोन एसटी आणि एखादी केएमटी बस जवळच्या थांब्यावर आली तर वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे शहर वाहतुकीत एसटीचा मोठा अडथळा होता. मात्र केएमटीची सेवा जेमतेम असल्याने एसटीला मिळणारा प्रवासी प्रतिसाद पाहता प्रवाशांची सोय एवढ्याच कारणाने ही सेवा शहरातून ग्रामीण भागात सुरू आहे. 

कोल्हापूर विभागाची स्थिती
नवीन एसटी गाड्या घेण्याच्‍या तीन वर्षांत चार वेळा घोषणा.
दोन वर्षांत कन्यागत पर्वासाठी जिल्हाभरात २० गाड्या नवीन आल्या. त्यानंतर नवीन गाड्या आलेल्या नाहीत. 
कोल्हापूर विभागात एसटीचालकांची ३०० पदे रिक्त आहेत. 
अनेकदा चालकांना एकाच गाडीत एक कमी अंतराची आणि दुसरी मोठ्या अंतराची फेरी.  
मागील वर्षीच्या भरतीतील २०० चालकांची निवड. त्यापैकी कोणाचीही नियुक्ती कोल्हापूर विभागात झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com