तलवार हल्ल्यात तरुण जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कोल्हापूर - एकमेकांकडे पाहण्यावरून शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टिंबर मार्केट परिसरातील मंदिराजवळ तलवार हल्ला झाला. यात सौरभ राजू चौगुले (वय १८, रा. टिंबर मार्केट) जखमी झाला. त्याच्यावर तीन वार झाले आहेत.

कोल्हापूर - एकमेकांकडे पाहण्यावरून शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टिंबर मार्केट परिसरातील मंदिराजवळ तलवार हल्ला झाला. यात सौरभ राजू चौगुले (वय १८, रा. टिंबर मार्केट) जखमी झाला. त्याच्यावर तीन वार झाले आहेत.

दरम्यान, सौरभने अरुण उदय पार्टे याने हल्ला केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याची शोधाशोध सुरू केली. थोड्याच वेळात अरुणच जखमी अवस्थेत ‘सीपीआर’मध्ये दाखल झाला. त्यानेही सौरभने मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी सेंट्रिंग कामगार सौरभ सायंकाळी केस कापण्यासाठी गेला होता. तेथून येत असताना अरुणच्या दारात त्यांच्या पत्नी उभ्या होत्या. दारात कुत्रा होता. सौरभकडे पाहून कुत्रा भुंकू लागला, तेव्हा सौरभने कुत्र्याला शिवीगाळ केली. या वेळी आपल्यालाच शिवीगाळ करीत असल्याचे अरुणच्या पत्नीला वाटल्याने त्यांनी घरी पती अरुणला जाऊन सांगितले.

अरुण आणि सौरभ यांच्यात वाद झाला. वादातून अरुणने घरातून तलवार आणून थेट सौरभवर हल्लाच चढविला. या वेळी डोक्‍यावरील वार चुकविताना सौरभने तो हातावर घेतला. तो पळत सुटताना त्याच्यावर आणखी दोन वार केले. ते वार मानेवर आणि कानाजवळ बसले. तो जखमी अवस्थेतच रस्त्यावर पडला. तेथे असलेल्या मित्रमंडळींनी त्याला रिक्षातून ‘सीपीआर’मध्ये आणले. त्याच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली.

याची माहिती पोलिसांना मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्यासह इतर पोलिस ‘सीपीआर’मध्ये दाखल झाले. सौरभ आणि त्याच्या नातेवाईकांनी अरुणने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांकडून अरुणचा शोध सुरू असतानाच तो जखमी अवस्थेत ‘सीपीआर’मध्ये दाखल झाला. त्याची पत्नी आणि नातेवाईकही ‘सीपीआर’मध्ये दाखल झाले.

Web Title: Kolhapur News one injured in sword attack