कांदा दराचा बहिरेवाडीच्या शेतकऱ्यांनाही फटका 

दीपक कुपन्नावर
बुधवार, 21 मार्च 2018

गडहिंग्लज - गेल्या पंधरा दिवसांत सर्वत्रच कांद्याचा दर गडगडला आहे. याचा फटका आजरा तालुक्‍यातील बहिरेवाडीच्या कांदा उत्पादकांना बसला आहे. बंगळूर बाजारपेठेत कांद्याला किलोला केवळ दहा ते अकरा रुपये असा दर मिळतो आहे.

गडहिंग्लज - गेल्या पंधरा दिवसांत सर्वत्रच कांद्याचा दर गडगडला आहे. याचा फटका आजरा तालुक्‍यातील बहिरेवाडीच्या कांदा उत्पादकांना बसला आहे. बंगळूर बाजारपेठेत कांद्याला किलोला केवळ दहा ते अकरा रुपये असा दर मिळतो आहे. दरवर्षीच्या तुलनेत दर निम्म्यावर आल्याने तोडणी आणि वाहतूक खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर पडत आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

गेल्या दशकभरात बहिरेवाडीच्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आकाराने मोठा असणाऱ्या गारवा कांद्याला बंगळूरच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. खासकरून हॉटेल व्यवसायासाठी हा कांदा प्राधान्याने वापरला जातो. कमी पाण्यात घसघशीत उत्पन्न देणारे पीक म्हणून कांदा घेण्याकडे स्थानिक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरवर्षी सुमारे 30 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. ऑक्‍टोबर महिन्यात लावलेला कांदा फेब्रुवारीपासून काढला जातो. सरासरी 400 टन कांद्याचे उत्पादन दरवर्षी घेतले जाते. 

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. खासकरून जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत कांद्याला सगळीकडेच आवक कमी असल्याने विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे आपल्या कांद्यालाही चांगला भाव मिळेल, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा लावला. 2200 रुपये किलो या दराने बियाणे खरेदी करून स्वतःच रोपे तयार करून कांद्याची लागवड केली. फेब्रुवारीपासून कांद्याची काढणी सुरू झाली. सुरुवातीला 20 ते 22 रुपये किलो असा दर होता. त्यानंतर मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात आवक वाढल्याने दर कोसळला आहे. सरासरी 10 ते 11 रुपये असा दर सध्या मिळतो आहे. 

बहिरेवाडीतील 95 टक्के कांदा बंगळूरला पाठविला जातो. त्यासाठी वाहतूक खर्चाची जबाबदारीही शेतकऱ्यांवरच असते. एका टनाला सरासरी 1600 ते 1700 रुपये वाहतूक खर्च आहे. घसरलेल्या दरामुळे वाहतुकीसह काढणीचा खर्चही भागेना झाला आहे. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून बंगळूरला माल पाठविणे बंद केले होते. स्थानिक बाजारपेठेत घरगुती वापरासाठी लागणाऱ्या लहान कांद्याचीच सर्वाधिक मागणी असते. त्यामुळेच बहिरेवाडीच्या मोठ्या कांद्याला स्थानिक ग्राहक कमी आहेत. परंतु गेल्या चार दिवसात बदललेल्या हवामानामुळे पावसाची चिन्हे असल्याने कांदा खराब होऊ नये म्हणून नाईलाजानेच शेतकऱ्यांनी बंगळूर गाठले आहे. 

पंधरा दिवसांत आवक वाढल्याने कांद्याचा दर निम्म्यावर आला आहे. त्यामुळे पदरमोड करून बंगळूरला कांदा पाठविणे आर्थिकदृष्ट्या पेलणारे नाही. स्थानिक बाजारपेठेत मोठ्या कांद्याला मागणी नसल्याने विचित्र अवस्था निर्माण झाली आहे. 
- शशिकांत शेवाळे, कांदा उत्पादक शेतकरी 
बहिरेवाडी,
आजरा 

कांदा उत्पादनासाठी एकरी 30 हजार रुपये खर्च येतो. घसरलेल्या दरामुळे वाहतूक खर्च, मजुरी देखील शेतकऱ्यांना परवडणारी नाही. मुळातच मजुरांची टंचाई, बियाण्यांचे वाढलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीत घसरलेल्या दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 
- रामा चौगुले,
कांदा उत्पादक शेतकरी, बहिरेवाडी, आजरा 

Web Title: Kolhapur News onion rate affects on Bahirewadi farmers