...अन्‌ ‘टायसन’ला मिळाली पुन्हा दृष्टी !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कोल्हापूर - सत्वशील जाधवांचा टायसन कुत्रा घरातल्या सगळ्यांचा लाडका. किंबहुना तो कुटुंबाचाच एक घटक. काही दिवसांपासून टायसन चालत चालत कधी खुर्चीला, कधी दरवाजाला, कधी भिंतीला धडकत होता. काही तरी जरूर प्रॉब्लेम होता.

कोल्हापूर - सत्वशील जाधवांचा टायसन कुत्रा घरातल्या सगळ्यांचा लाडका. किंबहुना तो कुटुंबाचाच एक घटक. काही दिवसांपासून टायसन चालत चालत कधी खुर्चीला, कधी दरवाजाला, कधी भिंतीला धडकत होता. काही तरी जरूर प्रॉब्लेम होता.

जनावरांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना दाखवले तेव्हा लक्षात आले, टायसनच्या डोळ्यात मोतिबिंदू. अशा उपचाराची सोय कोल्हापुरात नाही आणि मुंबईत उपचाराचा खर्च काही हजारात. जाधव परिवार चिंतेत होते आणि टायसनही रोज धडकत धडकत कसाबसा वावरत होता. पण आज चक्क कोल्हापुरात आणि तेही एक पैसा खर्च न करता टायसनवर मोतिबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. ‘टायसन’ला पुन्हा दृष्टी आली. 

पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई, शिरवळ व सोसायटी फॉर ऑनिमल प्रोटेक्‍शन कोल्हापूर (सॅप) या संस्थेतील प्राणीमित्र डॉक्‍टरांच्या मुळे हे आज कोल्हापुरात हे शक्‍य झाले. टायसन हे उदाहरण; पण राजन कुंभार यांच्या ‘स्टेला’ या कुत्र्याच्या पोटातील अडीच किलोची गाठ निघाली. याशिवाय अन्य पन्नासहून अधिक कुत्री, मांजरे, कबुतरे यांच्यावर छोट्या छोट्या शस्त्रक्रिया करून यांच्या विकारातून त्यांची सुटका केली. 

मुक्‍या जनावरावर उपचाराचे जरूर एक शास्त्र आहे. असे प्रगत उपचार देशातल्या काही मोठ्या शहरांत हेही खरे आहे; पण छोट्या छोट्या गावात जाऊन तेथील प्राणीमात्रांवर उपचार तेही मोफत आणि सर्व आधुनिक साधने सर्व खर्चाने सोबत आणून मोफत उपचार करणे हे व्रत काही जण कसे जपतात हे आज कोल्हापुरात दिसून आले.

डॉ. एस. एस. भट्टी, डॉ. डी. बी. पाटील, डॉ. जी. एस खांडेकर, डॉ. के. एस. चौधरी डॉ. एस. डी. त्रिपाठी, डॉ. शाहीर गायकवाड या मुंबई व गुजरातमधील डॉक्‍टरांनी उपचाराचे हे व्रत राबवले यातले डॉ. भट्टी हे तर माणसांच्या डोळ्यावर उपचार व शस्त्रक्रिया करणारे नामवंत नेत्रतज्ञ. पण त्यांचा मुक्‍या प्राण्यांवर खूप जीव. त्यामुळे आपल्या उपचार कौशल्याचा लाभ मुक्‍या प्राण्यांसाठी त्यांनी दिला. ते त्यांची स्वतःची किमती ऑपरेटिंग मायक्रोस्कोप घेऊन कोल्हापुरात आले. कामधेनू विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. बी. पाटील यांच्या सहकाऱ्यांसह सर्व साधनांसह येथे आले व कोणताही गाजावाजा नाही, फार मोठे काम करतो असा आविर्भाव न आणता त्यांनी ही सेवा दिली.

सॅप कोल्हापूरचे सुरेश शिरोडकर, डॉ. चंद्रहास कापडी, डॉ. डी. डी. चोपडे, डॉ. संतोष वाळवेकर, प्रा. अभिजित पाटील, सुलक्षणा आयरेकर यांनी संयोजन केले.

आपल्याला जो शारीरिक त्रास होतो, विकार होतो, तो डॉक्‍टरांना सांगू शकतो. त्यामुळे त्याच्यावर उपचार होऊ शकतात. पण मुके प्राणी त्यांचा त्रास सांगू शकत नाहीत, अशा वेळी त्यांचा त्रास जाणून घेणे उपचार करणे ही जबाबदारी आहेत. आम्ही ती आपल्या ताकतीने पार पाडली.
- डॉ. एस. एस. भट्टी

Web Title: Kolhapur News operation of Tyson dog