पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सांडपाणी व्यवस्थापनास जिल्हा परिषद देणार निधी

सुनील पाटील
बुधवार, 11 एप्रिल 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषदेतर्फे सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनाचे काम प्रगतिपथावर आहे; मात्र सध्या मंजूर आठ पैकी सहा गावांत जमीन हस्तांतरामुळे सांडपाणी व्यवस्थापन कामाला अडथळे निर्माण झाले आहेत. जमिनी हस्तांतरातील त्रुटी दूर करून तत्काळ याही गावांत सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी निधी दिला जाणार आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेतर्फे सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनाचे काम प्रगतिपथावर आहे; मात्र सध्या मंजूर आठ पैकी सहा गावांत जमीन हस्तांतरामुळे सांडपाणी व्यवस्थापन कामाला अडथळे निर्माण झाले आहेत. जमिनी हस्तांतरातील त्रुटी दूर करून तत्काळ याही गावांत सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी निधी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८ गावांतील सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा प्रदूषित होण्याचे प्रमाण ५२ टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. 

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध उपाय सुरू केले आहेत. जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या ३८ पैकी ८ गावांत सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रत्येकी चार कोटींचा निधी दिला जाणार आहे. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) आणि कोडोली या गावांतील सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू झाले. जि.प.च्या अखत्यारीत ३८ गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाचा अहवाल विभागीय आयुक्तांना दिला होता.

पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी सध्या आठ गावांत सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन राबविले जात आहे. सध्या पुलाची शिरोली आणि कोडोली या गावांतील काम सुरू आहे. सहा गावांत जमीन हस्तांतराबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया केली जात आहे. गावासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तरीही लोकांना विश्‍वासात घेऊन कामकाज सुरू आहे. 
- डॉ. कुणाल खेमणार,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर

या अहवालात प्रस्तावित ३८ गावांपैकी सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या ८ गावांत सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करण्याची मंजुरी मिळाली. यासाठी गायरान किंवा खासगी जमीन हस्तांतरण करून त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जि.प.ने ही जबाबदारी घेऊन हे काम जलद पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यान, शिरोली आणि कोडोली या दोन गावांव्यतिरिक्त इतर गावांमधील जमीन हस्तांतरणास अडथळे आहेत. या गावांत जमिनीला पर्यायी जमीन द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, लोकमागणीचा विचार करून जि. प.ने जमिनीच्या बदल्यात जमीन देण्यासाठी किंवा खासगी जमीनही घेण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. 

जीवन प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापनासाठी जागा निश्‍चित केली असेल तर, त्या जागा मालकाला इतर ठिकाणी व जागा मिळणार आहे. ज्या ठिकाणी अडथळे येत आहेत, त्याचेही निराकरण होऊन जिल्ह्यातील गावांत असणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू केली जातील. 

पंचगंगा सर्वाधिक प्रदूषित करणारी गावे : 
* करवीर : बालिंगा, हळदी, हणमंतवाडी, कांडगाव, कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेववाडी, परिते, शिंगणापूर, वळीवडे, वाकरे, आंबेवाडी, चिंचवाड, प्रयाग चिखली, वडणगे, * शिरोळ : शिरढोण, शिरदवाड, नांदणी. * हातकणंगले : कबनूर, चंदूर, रूई, हातकणंगले, तिळवणी 

पहिल्या टप्प्यात निधी मिळणारी गावे ८ : 
पहिल्या ८ गावांत प्रत्येकी ४ कोटी ५० लाखांचा निधी मिळणार आहे. यात, शिरोळ, हातकणंगले, उचगाव, पुलाची शिरोली, पट्टणकोडोली, हुपरी, कबनूर आणि रुकडी या गावांचा समावेश आहे. पुलाची शिरोली आणि शिरोळ येथे काम सुरू झाले.

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue