पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी अहवाल तयार

सुनील पाटील
मंगळवार, 5 जून 2018

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषित होण्यास कारणीभूत गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन आणि कायमस्वरूपी त्याची डागडुजी करावी, तसेच पंचगंगा कायमस्वरूपी प्रवाहित ठेवण्याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला आहे. नदीकाठच्या ८४ पैकी सुमारे ३९ गावांमधून सर्वाधिक प्रदूषण होते. त्यावर कायमस्वरूपी उपाय करावा, असा अहवाल दोन दिवसांत राज्य प्रदूषण नियंत्रण विभागाकडे आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. 

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषित होण्यास कारणीभूत गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन आणि कायमस्वरूपी त्याची डागडुजी करावी, तसेच पंचगंगा कायमस्वरूपी प्रवाहित ठेवण्याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला आहे. नदीकाठच्या ८४ पैकी सुमारे ३९ गावांमधून सर्वाधिक प्रदूषण होते. त्यावर कायमस्वरूपी उपाय करावा, असा अहवाल दोन दिवसांत राज्य प्रदूषण नियंत्रण विभागाकडे आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. 

खासदार संभाजीराजे यांनी पंचगंगा प्रदूषणाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सूचना करण्यात आल्यानंतर यंत्रणा हलली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनाचे काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील आठ गावांत सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा प्रदूषित होण्याचे प्रमाण ५२ टक्‍क्‍यांनी कमी होईल. दरम्यान, उर्वरित गावांमध्ये प्रदूषणमूक्तीसाठी उपाययोजना केली जाणार आहे. याशिवाय, सुमारे ३९ गावांमध्ये घनकचरा गावातच कसा निर्गत होईल. त्याचे कंपोस्ट खत कसे तयार करता येईल, याबाबत नियोजन केले जाणार आहे.

सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी पर्याय शोधावा लागेल. प्रत्येक गावाला सांडपाणी प्रक्रिया करणारी सक्षम यंत्रणा द्यावी लागणार असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. पंचगंगा नदीवर असणाऱ्या सुमारे ४० हून अधिक बंधाऱ्यांतील पाणी कायमस्वरूपी प्रवाहित ठेवावे लागेल. पाणी साचून राहिल्याने आणि ज्या-त्या गावातून दूषित पाणी आल्याने स्वच्छ आणि चांगले पाणीही दूषित होत असल्याचे सध्याचे चित्र आहे, असा आशयही अहवालात नमूद केला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रानुसार पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आवश्‍यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला आहे. तो राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दोन दिवसांत पाठविला जाईल. अहवाल मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. अहवाल तयार करताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ व इतर समित्यांची मते जाणून घेतली आहेत. 
- प्रशांत गायकवाड, 

प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर.

पंचगंगा सर्वाधिक प्रदूषित करणारी गावे

  •     करवीर : बालिंगा, हळदी, हणमंतवाडी, कांडगाव, कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेववाडी, परिते, शिंगणापूर, वळीवडे, वाकरे, आंबेवाडी, चिंचवाड, प्रयाग चिखली, वडणगे.
  •     शिरोळ : शिरढोण, शिरदवाड, नांदणी. 
  •     हातकणंगले : कबनूर, चंदूर, रूई, हातकणंगले, तिळवणी.

अहवालातील ठळक मुद्दे

  •     पहिल्या टप्प्यात आठ गावांत सांडपाणी व्यवस्थापन काम पूर्ण होणार
  •     प्रदूषणाचे प्रमाण ५२ टक्के कमी होणार
  •     ३९ गावांमध्ये घनकचरा गावातच निर्गत करणार
  •     कंपोस्ट खतासाठी प्रयत्न करणार
  •     सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी पर्याय शोधावा लागणार
  •     प्रत्येक गावासाठी सांडपाणी प्रक्रिया करणारी सक्षम यंत्रणा द्यावी लागणार
Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue