मोडला संसार तरी मोडला नाही कणा

नंदिनी नरेवाडी
शुक्रवार, 20 जुलै 2018

कोल्हापूर - पुराचे पाणी घरात शिरले, तरी जगण्याचा कणा ताठ ठेवून सुतारवाड्यातील कुटुंबे चित्रदुर्ग मठात स्थलांतरित झाली आहेत. सर्व प्रापंचिक साहित्य घेऊन येता आले नसल्याची खंत आहेच; पण पाळीव प्राण्यांचे काय झाले असेल, अशी हुरहूरही त्यांच्या मनात आहे. या कुटुंबांनी मठातच संसार थाटला आहे. मुलांचा अभ्यास तेथेच सुरू आहे. 

जयंती नाल्याच्या काठावर सुतारवाडा असून धुवाँधार पावसात सुतारवाड्यातील कुटुंबीयांना पुराची चिंता असते. घरात पाणी शिरले, की त्यांना चित्रदुर्ग मठ व मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतर व्हावे लागते. यंदा १६ जुलैला रात्री बारा वाजता ही कुटुंबे मठ व बोर्डिंगमध्ये स्थलांतरित झाली. मठात बाकडे टाकून व तेथेच गॅस मांडून कुटुंबातील पाच-सहा जण राहात आहेत. सतत पडणाऱ्या पावसाचा पत्र्यावरील आवाज, गळणारे छत, त्यात भिजणारे साहित्य वाचवतच त्यांचा दिवस सुरू होतो. झोपायला जागा नाही, जमिनीवर झोपले तर थंडी भरते, अशी स्थिती आहे. व्यावसायिक अमोल बुढ्ढे यांच्याकडून त्यांना नाश्‍ता व रात्रीचे जेवण दिले जाते. स्थलांतरित कुटुंबातील महिला धुण्या-भांड्याची कामे करत आहेत. पुरुष मंडळी पुरामुळे सुतारकाम व ट्रक दुरुस्तीची कामे करू शकत नाहीत.   

एकमेकांना धीर
पुरात जसे घर उभे आहे, तसेच जगण्याच्या लढाईत ही कुटुंबे ताठ मानेने उभी आहेत. सकारात्मक ऊर्जा ठेवून एकमेकांना ते धीर देत आहेत. आपापली कामे सांभाळत मुलांचा अभ्यास घेत आहेत. विशेष म्हणजे मठ परिसरात डास व किड्यांमुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवू नयेत, यासाठी पंचगंगा हॉस्पिटल व सीपीआरची आरोग्य यंत्रणा भेट देते.

मठात राहण्याची सोय जरूर होते. पण, घरातील घरपण वेगळेच असते. सुतारकामात व्यस्त राहणाऱ्या नवऱ्याला मदत करता येते. पुरामुळे कामे खोळंबतात. हातावरचे पोट असल्याने पैशाचा प्रश्‍न निर्माण होतो. 
- पद्मजा सुतार

Web Title: Kolhapur News Panchaganga flood situation effects