नऊ महिन्यांच्या ‘सानिध्य’चा मृतदेह मिळाला सहा तासांनी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

२६ जानेवारीला रात्री मिनीबस पंचगंगेत कोसळल्यानंतर रात्री बारापासून १३ मृतदेह पाण्यातच होते. एक एक करत पहाटे पाचपर्यंत बारा मृतदेह मिळाले; पण नऊ महिन्यांचा नवसाने झालेला सानिध्य सचिन केदार मात्र मिळत नव्हता. 

कोल्हापूर - ज्या ठिकाणी बस कोसळली, त्या जागेपासून अवघ्या  वीस-पंचवीस फुटांवर लाल टी शर्ट घातलेला मृतदेह मिळाला आणि पाण्यातूनच हात उंचावून उदयसिंह निंबाळकर यांनी मुलगा मिळाल्याची खूण केली. बघता बघता नऊ महिन्यांचा सानिध्य सचिन केदारचा मृतदेह तब्बल साडेसहा-सात तासांनी पाण्याबाहेर काढला.

२६ जानेवारीला रात्री मिनीबस पंचगंगेत कोसळल्यानंतर रात्री बारापासून १३ मृतदेह पाण्यातच होते. एक एक करत पहाटे पाचपर्यंत बारा मृतदेह मिळाले; पण नऊ महिन्यांचा नवसाने झालेला सानिध्य सचिन केदार मात्र मिळत नव्हता. 

नेहमीप्रमाणे सहा-साडेसहाच्या सुमारास परिसरातील श्री. निंबाळकर अंघोळीसाठी पंचगंगेत आले. तेथे तरुणांची चाललेली धडपड त्यांनी पाहिली आणि सानिध्यचा शोध घेण्यासाठी स्वतः पाण्यात उतरण्याचे ठरविले. ते पट्टीचे पोहणारे असून, आजपर्यंत तब्बल ७० हून अधिक मृतदेह पाण्यातून काढले आहेत. अनुभव असलेले उदयसिंह यांनी पाण्यात उडी घेतली आणि ज्या ठिकाणी बस कोसळली, तेथून त्यांनी सानिध्यचा शोध सुरू केला.

अंगावर केवळ लाल टी शर्ट, पायात वाळे, गळ्यात बदाम

उदयसिंह यांच्या शोधमोहिमेवर अनेकांचे डोळे लागून राहिले. बस ज्या ठिकाणाहून काढली तेथेच उदयसिंह यांनी शोध घेतला; मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांनी पाण्याच्या मुख्य प्रवाहातून पुलाच्या खाली जाण्यास सुरुवात केली. 

याचवेळी पाण्याबाहेर कठड्यावर उभे असलेल्यांनी इकडे जा तिकडे जा, असा सल्ला दिला; मात्र त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोधमोहीम सुरू केली. बस कोसळलेल्या ठिकाणापासून वीस-पंचवीस फुटांवर झुडुपांत त्यांनी शोध सुरू केल्यावर त्यांच्या नजरेस लाल रंगाचे कापड दिसले आणि त्यांनी तेथेच हात घातला. तेव्हा त्यांच्या हाती ९ महिन्यांचा सानिध्य लागला. त्याच्या अंगावर केवळ लाल टी शर्ट, पायात वाळे आणि गळ्यात बदाम होते. 

सानिध्यचा निपचित मृतदेह एका झुडपाआड होता. तेथे झुडप नसते, तर किमान एक-दोन किलोमीटरवर सानिध्यचा मृतदेह वाहून गेला असता, असे उदयसिंह निंबाळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: Kolhapur news Panchaganga River Bus accident

टॅग्स