पंचगंगा प्रदूषणमुक्‍तीचा आराखडा द्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कोल्हापूर - "पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा सादर केल्यास शासन दरबारी निश्‍चित त्याचा पाठपुरावा केला जाईल,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी लोकसहभागातून नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

कोल्हापूर - "पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा सादर केल्यास शासन दरबारी निश्‍चित त्याचा पाठपुरावा केला जाईल,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी लोकसहभागातून नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

जिल्हा परिषदेच्या वतीने कर्मचारी व सदस्यांसाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू पुरस्काराचे वितरण आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनय कोरे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आंतरजातीय विवाह करणाऱ्या तसेच दिव्यांगांबरोबर विवाह करणाऱ्या जोडप्यांचाही सत्कार झाला. 

पालकमंत्री म्हणाले, ""राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवत निवडणुकीनंतर गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. गावातील माणूस गावातच राहिला पाहिजे. त्यासाठी केवळ शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता गावामध्ये रोजगाराच्या संधी आणि गावाचे उत्पन्न वाढविले, तर गावांचा विकास होण्यास मदत होईल. सध्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यासाठी गावातील पाण्याचा साठा वाढविला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या वतीने विविध प्रश्‍न अध्यक्षांनी मांडले. त्या सर्वांचे प्रस्ताव शासनाला सादर करावेत. त्यावर ग्रामविकासमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून विषय मार्गी लावले जातील.'' 

माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, ""ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाची भूमिका घेतली पाहिजे. विकास करत असताना सर्व गावांना एकच मापदंड लावून चालणार नाही. कारण शहरालगत असलेली गावे, शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणारी गावे आणि दुर्गम व डोंगराळ भागातील गावे यांना एकच निकष लावून चालणार नाही. तीन पातळीवर त्यासाठी काम करणे आवश्‍यक आहे. शहरालगतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. या उलट चित्र दुर्गम भागातील शाळांचे आहे. त्यामुळे अतिरिक्‍त शिक्षकांची संख्या अधिक आहे. या करिता टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेने आठवी ते दहावीच्या शाळा सुरू कराव्यात आणि शाळांसाठी आठ-दहा किलोमीटरची विद्यार्थ्यांना करावी लागणारी पायपीट थांबवावी. निधी गावाला मिळणार आणि योजना मुंबईत एसीत बसून ठरणार हेदेखील थांबविण्याची आवश्‍यकता आहे. आज अनेक ग्रामसेवक, तलाठी यांची पुरेशी संख्या नसल्याने एकापेक्षा अधिक गावांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून मोबाईल ऍप बसविण्याची आवश्‍यकता आहे. त्याला अजिबात खर्च नाही, हजेरी लावण्याची आवश्‍यकता नाही. ती व्यक्‍ती कोठेही असली आणि फोन त्यांने बंद केला तरी ती व्यक्‍ती कोठे आहे, ते मुख्यालयात बसून समजू शकते. याचा विचार जिल्हा परिषदेने करावा. महापालिका नगरसेवकांप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांच्या मानधनातही वाढ करावी.'' 

अध्यक्ष सौ. महाडिक यांनी जिल्हा परिषद राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच विविध मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. या वेळी हंबीरराव पाटील, वसंत गाडे, अनिता चौगुले यांचीही भाषणे झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी प्रास्ताविक केले. 

कार्यक्रमास उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, पक्षप्रतोद विजय भोजे, तसेच सर्व अधिकारी, सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सत्कार मूर्ती 
सदस्य : हंबीरराव पाटील, अशोकराव माने, बजरंग पाटील, अनिता चौगुले, उज्ज्वला पाटील. कर्मचारी : दिनकर घुले, रवींद्र घुले, दयानंद पाटील, प्रकाश इंदुरकर, दत्तात्रय सलगर, संतोष पवार, मायाप्पा शिणगारे, विलास तराळ, वसंत गाडे, सचिन माने, संजय सोनवणे, आशाराणी गायकवाड, विनायक काटकर, छाया जाधव, जयप्रकाश लोले. आंतरजातीय विवाह केलेले जोडपे : विनोद माने व दीपाली कुलकर्णी, रोहित ठोंबरे व पूजा उपळेकर, प्रशांत कांबळे व गीतांजली पाटील. अपंग-अव्यंग विवाहित : शंकर टिपुगडे व सुप्रिया सखाराम टिपुगडे आणि अमोल बाबूराव कुंभार व पद्मश्री बापू कुंभार. 

सावकर नाही आता डॉक्‍टर 
""विनय कोरे यांना आपण यापूर्वी सावकर म्हणत होतो. जिल्हा परिषदेत आमच्या गटाची सत्ता आणण्यात यांचा खूप मोठा वाटा आहे. आता त्यांना डी.लीट पदवी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना आजपासून आपण डॉक्‍टर म्हणू,'' असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

Web Title: kolhapur news Panchganga Pollution chandrakant patil