पंचगंगेचे रसायनयुक्त पाणी शिरोळच्या बंधाऱ्यापर्यंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

जयसिंगपूर - रसायनयुक्त सांडपाणी अद्यापही पंचगंगा नदीच्या तळाशी राहिल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, रसायनयुक्त पाणी आता शिरोळच्या बंधाऱ्यात साचल्याने या ठिकाणीही दुर्गंधी निर्माण झाली आहे.

जयसिंगपूर - रसायनयुक्त सांडपाणी अद्यापही पंचगंगा नदीच्या तळाशी राहिल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, रसायनयुक्त पाणी आता शिरोळच्या बंधाऱ्यात साचल्याने या ठिकाणीही दुर्गंधी निर्माण झाली आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीकाठचा पंचनामा केला असला तरी केमिकलयुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडून हजारो मासे, तसेच जलचरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी अद्याप ठोस पावले पडली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रसायनयुक्त सांडपाणी चार दिवसांपूर्वी थेट पंचगंगेत सोडण्यात आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. चार दिवसांपूर्वीच्या या प्रकारानंतर अद्याप नदीच्या तळाशी रसायनयुक्त पाणी दिसून येते. ग्रामस्थांच्या आरोग्याचा धोका अजूनही टळलेला नाही. 

शिरढोणसह नदीकाठावरील गावांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असताना रसायनयुक्त पाणी आता शिरोळच्या बंधाऱ्यात येऊन थांबले आहे. बंधाऱ्यालगत दुर्गंधी सुटली आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याचे फारसे काही सोयरसुतक आहे, असे वाटत नाही. उदगावजवळ कृष्णा नदीपात्रातही अशीच घटना घडली होती. त्याआधी कनवाडनजीक रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आले होते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचनामा करण्यापलीकडे काहीच केले नाही. तालुक्‍यात दोन वर्षांत सात ते आठ वेळा अशा घटना घडूनही याप्रकरणी मुळाशी जाऊन कोणालाही जबाबदार धरण्यात आले नसल्याने कारवाईदेखील करता आली नाही.

नदी प्रदूषणाबाबत कळवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रात्रीच्या अंधारात पाहणी करायला येतात, यावरून त्यांच्यातील कर्तव्याची भावना कशी नाहीशी झाली आहे, हे लक्षात येते. आता तरी प्रदूषण मंडळाने सखोल माहिती घेऊन पंचगंगा दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पंचगंगा नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी पडले. ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे प्रकार सातत्याने घडत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र तसे होत नसल्यानेच असे प्रकार वाढू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याप्रकरणी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणार आहे.
- विजय भोजे, जिल्हा परिषद सदस्य

Web Title: kolhapur news Panchganga River Jaysingpur