पाणीदार मजलेसाठी अडीच हजारावर स्वयंसेवकांचे योगदान

नंदु कुलकर्णी
बुधवार, 2 मे 2018

आळते - साथी हात बढाना साथी रेरेरे...या स्फुर्ती गीताप्रमाणे मजले (ता. हातकणंगले ) येथील गावकऱ्यांनी व आसपासच्या गावातील सेवाभावी व्यक्तींनी व संस्थानी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान केले.

आळते - साथी हात बढाना साथी रेरेरे...या स्फुर्ती गीताप्रमाणे मजले (ता. हातकणंगले ) येथील गावकऱ्यांनी व आसपासच्या गावातील सेवाभावी व्यक्तींनी व संस्थानी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान केले. अडीच ते तीन हजार युवक, युवती, बालगोपालांसह महिला व पुरुष पाणीदार मजले करण्यासाठी एकवटले होते. पहाटेपासुन डोंगरावर व पायथ्याशी गर्दीमुळे तुफान आलया !!! असे चित्र दिसत होते.

एक मे कामगार दिनाच्या निमित्ताने पाणी फौंडेशन या संस्थेने महाश्रमदान शिबिर आयोजित केले होते. फौंडेशनच्यावतीने संपुर्ण गांव बंद ठेवुन घरातील प्रत्येकाने श्रमदानासाठी हजर राहण्याच्या आवाहनाला गावकऱ्यांनी भरघोस पाठिंबा दिला. पहाटे साडे पाच वाजल्यापासुन प्रत्येक घरातील महिला, पुरुष व लहान मुले हातात खोरे, पाटी, टिकाव घेवुन जोमाने काम करीत होते. त्याचबरोबर सांगली येथील जेसन फौड्रीं ( संजय जाधव ग्रुप) या कंपनीतील २५० कामगार व आधिकाऱ्यांनी कामगार दिनानिमित्त श्रमदान करुन सुट्टी साजरी केली. 

अडीच ते तीन हजार स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे हात एकाच वेळी झपाझप पाट्या टाकत होते. यामुळे एका दिवशी तब्बल पाच ते सहा एकर क्षेत्रावर श्रमदान झाल्याने सर्वत्र समांतर खोल चरी दिसत होत्या . 

श्रमदानासाठी उदगांवच्या रोहीदास युवा मंच, संतसेना, संभाजी प्रतिष्ठान, ड्रीम फौंडेशनचे स्वयंसेवक, भारतीय जैन संघटनेचे जिल्हयाचे व राज्याचे पदाधिकारी, इचलकरंजी नागरिक मंच, आचार्य आनंद युवा मंच, संवाद सामाजिक मंडळ, मारवाडी ट्रेकींग ग्रुप, वीर सेवा दल (कोल्हापूर), शिवसेना कबनुर चे शिवसैनिक, आमदार राजीव आवळे यांच्यासह अन्य गावातुन आलेल्या जलमित्र स्वयंसेवकांनी श्रमदान केले.

दरम्यान प्रांताधिकारी समीर शिंगटे व तहसिलदार वैशाली राजमाने यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

तीन माहिन्याचे काम एका दिवसात पूर्ण 
मजले फौंडेशनचे काम गेल्या तीन महिन्यापासुन सुरु आहे. यासाठी जलमित्र मोठया संख्येने स्वतःच्या ताकदीप्रमाणे राबत कामाचा डोंगर उभा केला आहे. पण आजच्या महाश्रमदानासाठी एकाच वेळी अडीच ते तीन हजार जलमित्र एकवटल्याने तीन महिन्याचे काम एका दिवसात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नाष्टा पाण्याचीही सोय

स्वयंसेवकासाठी संदीप कारंडे यांच्या सोनाली उद्योग समुहाच्या वतीने भरपेट नाष्ट्याची सोय केली होती, तर अविनाश पाटील यांच्या पार्श्वअॅग्रोच्यावतीने केळी वाटप केली. तर पिण्याच्या पाण्याची सोय सुनिल पाटील (कोरोची ), भरत पाटील ( रावजी ) यांनी केली होती . 
 

Web Title: Kolhapur News Panidar Majale special story