डॉ. वीरेंद्र तावडेच ‘मास्टर माइंड’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा ‘मास्टर माइंड’ सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडेच आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला.

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा ‘मास्टर माइंड’ सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडेच आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला. यापूर्वीही सीबीआयने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे, असे सांगून जामीन नामंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. युक्तिवादानंतर पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवली. या वेळी ॲड. शिवाजीराव राणे यांच्यासह पानसरे यांच्या सून मेघा पानसरे उपस्थित होत्या.

पानसरे हत्येत संशयित आरोपी तावडेला अटक झाली आहे. त्याला जामीन मिळावा, या मागणीचा अर्ज त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात केला. त्यावर त्यांनी सुमारे दोन तासांहून अधिक वेळ युक्तिवाद करून, पानसरेंच्या हत्येत डॉ. तावडेंना विनाकारण गोवले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे चार्जशीट (दोषारोपपत्र) येथे कॉपी-पेस्ट केले आहे, असा युक्तिवाद केला होता.

त्यांनी उर्वरित युक्तिवाद करताना सांगितले, की यापूर्वीही संशयित आरोपी समीर गायकवाडलासुद्धा जामीन दिल्यास तो बेपत्ता होईल, असे सांगण्यात येते होते; मात्र आजपर्यंत तो एसआयटीकडे वेळोवेळी हजेरी देत आहे. त्याचे कोणतेही गैरवर्तन नाही. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणीही तावडेला दहा दिवस रोज चौकशीसाठी बोलाविले जात होते. त्यानंतर त्याला अटक झाली आहे. तेव्हा तो पळून जाऊ शकत होता. असे त्यांनी केले नाही. म्हणून त्याला जामीन मिळावा, अशी मागणी आज करीत आहोत.

विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी जोरदार युक्तिवाद करीत डॉ. तावडेच हत्येचा ‘मास्टर माइंड’ असल्याचा युक्तिवाद केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर आणि पानसरे हत्येच्या ‘चार्टशीट’मध्ये साम्य आहे. त्यामध्ये गुन्हेगार एकच आहे, असेही निंबाळकर यांनी न्यायालयात निदर्शनास आणून दिले.

या वेळी ॲड. पटवर्धन यांनी हस्तक्षेप करीत मध्येच बोलणे सुरू केले. या वेळी दोन्ही वकिलांत शाब्दिक वाद झाला. अखेर न्यायाधीश यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला. त्यानंतर पुन्हा ॲड. निंबाळकर यांनी त्यांचा युक्तिवाद सुरू ठेवला. ज्या दिवशी पानसरेंचा खून झाला, त्या दिवशीच समीर गायकवाडच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर डॉ. तावडे समीरशी बोलला आहे. त्या दिवशी तावडे पनवेलमध्ये नव्हता, हे सुद्धा दिसून येते. त्याचे वास्तव्य पूर्वीही कोल्हापुरात होते. करवीर मठाधिपती शंकराचार्य यांच्या विरोधात पानसरे यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रतिमोर्चा काढण्याची जबाबदारी तावडेवर होती. त्याचे तेव्हा कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यानंतरही पिस्तुलाच्या निमित्ताने त्याने कोल्हापुरातील एका साक्षीदाराशी संवाद साधला आहे. यासह न्यायालयात जबाब नोंदविलेल्या साक्षीदारांनीही याला पुष्टी दिल्याचे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यापूर्वी सीबीआयनेही तावडेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. येथेही त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

 

Web Title: Kolhapur News Pansare Murder case