काहीही करा; दसरा चौक आपलाच

सुधाकर काशीद
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ट्रक, टेम्पो किंवा कोणतेही वाहन तांत्रिक कारणामुळे बंद आहे. अशा अवस्थेत ते थांबवून ठेवायला जागा कोठे आहे? मग त्यासाठी दसरा चौक आपलाच आहे..!

कोल्हापूर - ट्रक, टेम्पो किंवा कोणतेही वाहन तांत्रिक कारणामुळे बंद आहे. अशा अवस्थेत ते थांबवून ठेवायला जागा कोठे आहे? मग त्यासाठी दसरा चौक आपलाच आहे..!

घरातील, दुकानातील सर्व भंगार बाजूला काढले आहे. ते टाकायला जागा नाही... त्यासाठीही दसरा चौकाचा एक कोपरा तुमचाच आहे..! रात्री खुल्या हवेत मद्यपान करीत बसायला जागा हवी आहे... दसरा चौक त्यासाठी तर आरामात वापरलाच जात आहे..! दसरा चौक कोल्हापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचा जिता जागता साक्षीदार आहे. पण सध्या हा चौक म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी सजलेला आणि इतर ३६४ दिवस कोणीही वाली नसलेला चौक झाला आहे. शहराच्या मध्यावर असलेली खुली हवेशीर मोकळी जागा किती वाईट पद्धतीने वापरली जाते, याचे दसरा चौक हे उदाहरण ठरले आहे. 

दसरा चौक ही छत्रपती घराण्याच्या ताब्यातील मोकळी जागा. या चौकाला खूप मोठा इतिहास आहे. पूर्वी चौफाळ्याचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माळावर १८४१ मध्ये म्हणजे १७६ वर्षांपूर्वी सातारचे छत्रपती व करवीर छत्रपती यांच्या भेटीचा ऐतिहासिक सोहळा घडल्याचा इतिहास आहे. १८४१ मध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी सातारचे छत्रपती आप्पासाहेब आले होते, त्या वेळी या माळावर डेरे बांधले होते. 
सोन्यारूप्याच्या फुलांची वृष्टी करून त्यांचे स्वागत झाले. याच माळावरून छत्रपतींना हत्तीवरून अंबाबाई दर्शनासाठी नेले. याच दसरा चौकात विजयादशमीला सोने लुटण्याचा सोहळा होत राहिला. याच चौकात शाहू महाराजांनी शिक्षणाचा पाया घातला. चौकाच्या समोरासमोर मराठा, जैन, सारस्वत, मुस्लिम, लिंगायत समाजाची वसतिगृहे बांधली. आजही ते कोल्हापूरचे वेगळेपण आहे. याच चौकात १९२९ मध्ये छत्रपती शाहूंचा पुतळा उभा राहिला. 

कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचा दसरा चौक साक्षीदार आहे. पण, त्याची अवस्था आज ‘आओ, जाओ घर तुम्हारा’ अशी झाली. छत्रपती घराण्याने १९९५ मध्ये हा चौक दसऱ्याला सोने लुटण्याच्या सोहळ्यासाठी देण्याच्या अटीवर महापालिकेस सुपूर्द केला आणि या दसरा चौकाचा थाटच हरवला. 

या ऐतिहासिक दसरा चौकात पहिल्यांदा महापालिकेने खडीचे ढीग ओतून त्याचे गोदामच तयार केले. त्यानंतर केएमटी थांबविण्यासाठी जागा घेतली. त्यानंतर चौकाची जागा प्रदर्शनासाठी दिली जाऊ लागली. आता या चौकात शाहू स्मारकमधील कार्यक्रमाचे पार्किंग होते. क्षणभर हे ठीक आहे; पण समारंभ संपल्यावर दसरा चौकातील सर्व वाहने बाहेर जाणे आवश्‍यक आहे. मात्र, उलटेच घडते आहे. अनेक जणांनी या चौकात कायमचे पार्किंग केले. वाद्‌ग्रस्त वाहने याच चौकात ताडपत्री झाकून ठेवली जात आहेत. एक कचराकुंडी म्हणजे कचऱ्याचा डोंगर झाला आहे. कोणीही रात्री या ठिकाणी कसलाही कचरा आणून टाकण्याची ‘सोय’ झाली. रात्री खुल्या हवेत मद्यपान तर रोजची बाब झाली. दसऱ्याच्या आधी दोन-तीन दिवस चौकाची स्वच्छता केली जाते. तेथे थांबविलेल्या बंद वाहनांना क्रेनने ओढून बाजूला काढावे लागते. 

आठवण फक्त दसऱ्यालाच 
वास्तविक शाहूंचा पूर्णाकृती पुतळा, शाहू स्मारक, विद्यार्थी वसतिगृहे यांच्यालगत दसरा चौक हा मोठा व खुला आहे. तेथे बसायला बाक, दिव्यांची सोय केली तर उन्हाळ्यात एका वेळी चार-पाचशे लोक गार हवेची झुळूक अंगावर घेत बसू शकतील, असे वातावरण आहे. पण दसऱ्यालाच या चौकाची आठवण येते, अशी परिस्थिती आहे. 

दसरा चौकाची शान कायम ठेवून कुटुंबांना व ज्येष्ठ नागरिकांना सायंकाळी खुल्या हवेत बसता यावे, यासाठी एक रचना भविष्यात केली जाणार आहे. सध्या चौकात हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तेही दिवाळीनंतर काढले जाईल.
- नेत्रदीप सरनोबत, 
शहर अभियंता, महापालिका

Web Title: kolhapur news Parking in Dasara Chouk