भांडण पार्किंगचं... गोंधळ साखरपुड्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

सुरवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की या प्रमाणे हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोचले.

कोल्हापूर : मंगळवारपेठेच्या एका कोपऱ्यात भांडण जुंपले. प्रकरण हातघाईवर आल. भांडणाऱ्यांच्यातील दोघे चौघे एकमेकाला ढकलत पुढे पुढे गेले. त्यातलाच एक गट चक्क एका मंगलकार्यालयातच घुसला. साखरपुड्याच्या मंगलमय सोहळ्यात दंग झालेले अत्येष्ठ चक्रावून गेले. घुसलेले नेमके कोण? याचा अंदाज घेऊ लागले. अंदाज चुकला. घोटाळा झाला आणि अत्येष्ठ एकमेकांच्या अंगावर धक्काबुकीसाठी तुटून पडले. दोघांचे भांडण आणि तिसऱ्यांनाच मनस्ताप सोसण्याची वेळ आली. 

शहरात वाहतुकीची कोंडी चौकाचौकत आहे. तळघरातील जागा व्यवसायिक कारणासाठी व्यापली आहे. अशात गाडी लावायची कोठे यावरून प्रत्येक वाहन धारकाच्या डोक्‍यात रोजचा ताण आहे. अशाच ताणात असलेले दोघे जण मंगळवार पेठ बेलबाग येथे गाडी लावण्यावरून एकमेकांसमोबत भांडू लागले. त्यांच्या सोबत असलेल्यांनी एकमेकांविरोधात भांडणात साथ दिली. सुरवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की या प्रमाणे हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोचले. त्याच क्षणी एका गटाने गर्दीतून पळ काढत थेट शेजारच्याच मंगलकार्यालयात प्रवेश केला. त्यांचा पाठलाग करत प्रतिस्पर्धी गट मंगलकार्यालयात घुसला. तिथे आरडाओरड ते गळपट धरणे असा प्रकार सुरू झाला. 

मंगलकार्यालयात साखर पुड्याचा कार्यक्रम सुरू होता. दोन्ही बाजूकडील मंडळी नटून थटून उत्सुकतेचे भाव चेहऱ्यावर आणून बसली होती. अचानक त्यांच्या समोर धक्काबुकी आरडाओरड सुरू झाली. तसे ते हबकले. त्यातील काही जणांचा असा समज झाला की भांडणारे मुलीकडील असावेत तर मुलीकडच्यांना मुलाकडील भांडणारे असावेत. असे समजून भांडण सोडविण्यास काहींनी पुढाकर घेतला. दंगा घालणाऱ्यांना आवरण्याचा प्रयत्न करू लागले. तु कोण मला सांगणार यावरून नातेवाईकात जुंपली. तो पर्यंत हाणामारी करणाऱ्यांनी पळ काढला. या सगळ्याचा धसका घेत एक पुरुष नातेवाईक चक्कर येऊन पडला. तसा गोंधळात तिसरा गोंधळ वाढला. अखेर जाणकारांनी पुढाकार घेत घडल्या प्रकारात आपल्यातील कोणाचाच काही संबध नाही हे बाब पटवून दिली. तसा पुढील साखरपुड्याचा सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: kolhapur news parking fight engagement function fiasco