दर्जेदार गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल - पाशा पटेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

कोल्हापूर - कोल्हापुरी गुळाला जगात मागणी आहे. या गुळाचा दर्जा सुधारला पाहिजे. दर्जा सुधारल्यानंतर गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल; पण याच गुळामध्ये साखर, हायड्रोस पावडर किंवा रसायन मिसळून स्वत:च्या तोंडाला काळे फासून घेऊ नका, असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. 

गूळ व्यवसायाबाबतचे सर्व प्रश्‍न जाणून घेण्यासाठी कृषिमूल्य आयोगांतर्गत शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभागप्रमुख ए. एम. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली गूळ हमीभाव उपसमितीची घोषणाही श्री. पटेल यांनी कोल्हापुरात केली. येथील कृषी महाविद्यालयात गूळ हमीभाव प्राथमिक बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. 

पाशा पटेल म्हणाले, ‘‘पाडळी खुर्द येथील भेटीवेळी शेतकऱ्यांनी हमीभावाची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे. हायड्रोस पावडर मिसळली जाते, यामुळे गुळाचा रंग सफेद होतो. पण तो खाण्यायोग्य राहत नाही, अशी मते सर्वच घटकांमधून मांडली. काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांनी कोल्हापुरी गुळाची गुणवत्ता बिघडवली आहे. त्यामुळे मागणीवर परिणाम झाला आहे.’’ 

शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभागप्रमुख ए. एम. गुरव म्हणाले, ‘‘कोल्हापुरी गुळापासून ६५ प्रकारचे पदार्थ तयार करता येतात; मात्र हा गूळ साखर किंवा हायड्रॉस मिश्रित नसावा.’’  
शाहू गूळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापुरी गूळ तब्बल १२१ देशांत निर्यात केला जातो. हे आकडे नाफेडाने सांगितले आहेत. याचा विचार करून रसायनविरहित गुळाला प्राधान्य दिले पाहिजे.’’

बाबासाहेब पाटील, सीमा नागवेकर, डॉ. जी. जी. खोत, डॉ. पी. एम. चौधरी, डॉ. डी. बी. यादव, भगवान काटे, श्रीकांत घाटगे, मोहन पाटील (पाडळी खुर्द), शिवाजी पाटील (साबळेवाडी) उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Pasha Patel comment