विद्यार्थ्यांची परदेश झेप...

राजेश मोरे
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - परदेशी जाण्यात तरुणाईचा वाढता कल आहे. जिल्हाभरात सहा महिन्यांत दिलेल्या १८ हजार पासपोर्टपैकी ८५ टक्‍क्‍यांहून अधिक पासपोर्ट हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. यात बहुतेकांनी उच्चशिक्षणासह नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर होण्यासाठी विदेशी जाण्याचे कारण दिले आहे.

कोल्हापूर - परदेशी जाण्यात तरुणाईचा वाढता कल आहे. जिल्हाभरात सहा महिन्यांत दिलेल्या १८ हजार पासपोर्टपैकी ८५ टक्‍क्‍यांहून अधिक पासपोर्ट हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. यात बहुतेकांनी उच्चशिक्षणासह नोकरी, व्यवसायात स्थिरस्थावर होण्यासाठी विदेशी जाण्याचे कारण दिले आहे.

पर्यटन, औषधोपचार, नातेवाईक, नोकरीसाठी पासपोर्ट काढण्याचे प्रमाण अधिक होते. स्पर्धात्मक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाबरोबर इतर शैक्षणिक क्षेत्रालाही महत्त्व वाढले.

पालकांनीही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. तशी पदवीनंतर उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. उच्चशिक्षणानंतर नोकरीत स्थिरस्थावर व्हायचे असेल तर पुणे, मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद अशा मेट्रो सिटीतील मोठमोठ्या कंपन्यांत नोकरी करावी लागणार. काम करताना परदेशातही जावे लागणार. त्यासाठी पासपोर्ट गरजेचा आहे. मोठमोठ्या कंपन्यांत नोकरीसाठी मुलाखतीवेळी वाहन परवान्याबरोबर पासपोर्ट आहे का, याची प्रामुख्याने विचारणा केली जाते. त्यामुळे शिक्षित तरुणांकडून अग्रक्रमाने सध्या पासपोर्ट काढला जातो.

जिल्ह्यात पासपोर्ट काढणाऱ्या तरुणांनी दोन वर्षांत २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांत ८५ टक्‍क्‍यांहून अधिक प्रमाण हे तरुणाईचे आहे. उच्चशिक्षणासह नोकरी-व्यवसायासाठी परदेशी जाण्याचे कारण त्यांनी पोलिस चौकशीत नमूद केले आहे. पासपोर्ट जलदरीत्या नागरिकांना मिळावा, यासाठी पोलिस चौकशीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आलेल्या पासपोर्ट अर्जांची एक ते दोन दिवसांत पोलिस ठाण्याकडून निर्गत केली जाते. त्याच्यावर खुद्द पोलिस अधीक्षकांचाही वॉच असतो. त्यामुळे जलदरीत्या पासपोर्ट काढता येऊ लागले आहेत.

पासपोर्टची प्रक्रिया ः 

  •  https://portal२.passportindia.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणे, शुल्क भरणे
  •  अपॉइंटमेंट घेणे (मुलाखतीची तारीख)
  •  मुलाखतीवेळी सर्व कागदपत्रांची छाननी
  •  संबंधित जिल्हा अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी अर्ज
  •  संबधित पोलिस ठाण्याकडून चौकशी 
  •  चौकशी अहवाल पासपोर्ट कार्यालयाकडे
  •  कागदपत्रांसह कायदेशीर बाबींची पूर्तता
  •  टपालाने पासपोर्ट घरी
Web Title: Kolhapur News passport registration in district