जुन्या बुधवार पेठकरांची मैदानासाठी जिगर...

सुधाकर काशीद
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - जुना बुधवार पेठ खूप जुनी वसाहत; पण पटणार नाही, या पेठेत खेळाचे एकही मैदान नाही. जवळच्या डी.वाय.एस.पी. ऑफिसच्या मैदानावर पोरं चोरून खेळायची; पण एक दिवस या मैदानावरही येण्यास पोरांना बंदी आली आणि पेठेला मैदानच उरलं नाही; मात्र पेठ तशी जिद्दीची. पेठेनं ठरवलं, आपण नवं मैदानच तयार करायचं आणि तशी तयारी सुरू झाली.

कोल्हापूर - जुना बुधवार पेठ खूप जुनी वसाहत; पण पटणार नाही, या पेठेत खेळाचे एकही मैदान नाही. जवळच्या डी.वाय.एस.पी. ऑफिसच्या मैदानावर पोरं चोरून खेळायची; पण एक दिवस या मैदानावरही येण्यास पोरांना बंदी आली आणि पेठेला मैदानच उरलं नाही; मात्र पेठ तशी जिद्दीची. पेठेनं ठरवलं, आपण नवं मैदानच तयार करायचं आणि तशी तयारी सुरू झाली. ब्रह्मपुरी टेकडीच्या पायथ्यालगत पडून असलेल्या जागेत हळूहळू भर घातली जाऊ लागली. आता ही भर अंतिम टप्प्यात आली. शेणाची गार, शेणी थापायच्या या जागेवर मैदानाने आकार घेतला आहे. येत्या रविवारी तर अख्खी बुधवार पेठ मैदानावर श्रमदानासाठी उतरणार आहे आणि जिद्दीला पेटली; तर बुधवार पेठ काय विधायक करू शकते, हेच कोल्हापूरकरांना दाखवून देणार आहे. 

बुधवार पेठ खूप दाटीवाटीच्या वस्तीचा भाग आहे. पेठेच्या मधल्या भागातून रत्नागिरी-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे चोवीस तास वाहतूक आहे. मुलांना रस्त्यावर खेळायचे राहूदेच; पण रस्त्यावर येणेही अशक्‍य अशी परिस्थिती आहे. पेठेतली पोरं त्यामुळे जवळच्या डी.वाय.एस.पी. ऑफिसच्या मैदानावर (जुना बुधवार पोलिस लाईन) खेळायची; मात्र खेळाच्या गलक्‍याच्या त्रासामुळे एका साहेबाने हे मैदान खेळासाठी बंद केले. पेठेतल्या लोकांनी मोर्चा काढला. मग या मैदानावर बांधकाम होणार असे पोलिस प्रशासनाने जाहीर केले. पाया खोदाईही सुरू केली; पण लोक न्यायालयात गेले व त्यानंतर या ना त्या कारणाने मैदान खेळासाठी बंदच झाले. 

त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सव व शिवजयंती मिरवणुकीत बुधवार पेठेचा ‘कोणी मैदान देता का मैदान?’ हा फलक झळकत राहिला व प्रशासनाचे लक्ष वेधत राहिला. याच दरम्यान महापालिकेने ब्रह्मपुरी टेकडीच्या पायथ्याला स्मशानभूमीच्या रस्त्यालगत पिरजादे यांच्या जागेत उद्यानासाठी आरक्षण टाकले; पण उद्यान तर राहूदेच, जागेतील कचराही गेल्या २० ते २५ वर्षांत काढला नव्हता. त्यामुळे याच जागेत मैदान उभे करायचा विचार लोकांच्या मनाज रुजू लागला. चार-पाच वर्षांत हळूहळू भर घातली जाऊ लागली. वर्षभरात नगरसेवक अफज पिरजादे यांनी महापालिकेची मदत घेत आणखी भर घातली व मैदानाला बऱ्यापैकी आकार आणला. 

रविवारी अख्खी पेठ श्रमदानात
आता एवढं काम झालं म्हटल्यावर, प्रत्यक्ष श्रमदानासाठी पेठेतील लोकच एकत्र आले. पक्ष, गट, तट सगळं बाजूला ठेवून रविवारी सकाळी ते एकत्र येणार आहेत. या मैदानाच्या पुढच्या विकासासाठी जे काही करणे आवश्‍यक आहे, ते श्रमदानातून करणार आहेत. ते झालं की, या जागेवर मुरुमाचा भर टाकून सपाटीकरण केले जाणार आहे. ‘लोकांनी लोकांसाठी लोकांच्या श्रमदानातून उभारलेले मैदान’ अशीच या मैदानाची एक वेगळी ओळख होणार आहे. 

या जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे; पण गेल्या २० वर्षांत रुपयाही उद्यानासाठी खर्च झाला नाही. या जागेजवळूनच स्मशान मार्ग व मृतदेह स्मशानात नेण्यापूर्वी काही क्षण एका कट्ट्यावर ठेवण्याचे ठिकाण येथेच असल्याने तेथे कदाचित उद्यान झाले नसावे. त्यामुळे जागा पडूनच राहिली; पण आता महापालिकेत सर्वांची मदत घेऊन उद्यानाऐवजी मैदान असा ठराव करून घेतला जाईल. निदान त्यामुळे वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जागेचे तेथे मैदान झाल्याने सोनेच होईल.
- अफजल पिरजादे, 

   नगरसेवक

Web Title: Kolhapur News peoples unity for sport ground