पेठवडगावातील ६ जणांना सक्तमजुरी

पेठवडगावातील ६ जणांना सक्तमजुरी

कोल्हापूर - कर्तव्य बजावत असताना कनिष्ठ अभियंत्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सहाजणांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रत्येकी १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दंडातील रकमेतून फिर्यादीस ५० हजार नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ एल. डी. बिले यांनी दिले. सरकारी वकील म्हणून मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.

शिवाजीराव महादेव आवळे (वय ३५), तय्यब बशिर खाटीक, योगेश सुरेश सूर्यवंशी, अमोल शिवाजी जाधव, सुरेश महादेव आवळे (सर्व पेठवडगाव), गजानन शामराव धनवडे (भादोले) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. संशयितातील मोहन सदाशिव आवळे मृत झाले असून, सुनील सदाशिव जमानावर (म्हैशाळ, ता. मिरज, जि. सांगली) यांची निर्दोष मुक्तता केली.

पेठवडगावात ९ एप्रिल २००९ ला दुपारी दीडच्या सुमारास गोसावी गल्लीतील मिनी फिडर पिलरमध्ये दोन वर्षाच्या सूर्याक्ष संजय माळी याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी एकत्रित येऊन कट रचून रॉकेल, ऑईल घेऊन दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण करून साहित्याची मोडतोड केली. काही कर्मचाऱ्यांना आरोपींनी मीटर टेस्टिंग रूममध्ये कोंडून घातले. आरोपी शिवाजीराव आवळे याने बाहेरून कडी घालून अभियंता संदीप भानुदास गावडे (रा. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली) यांना मारहाण करून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांनी संदीप यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना ओढत रस्त्यावर आणले, तेव्हा पोलिस मुल्लाणी व चव्हाण तेथे आले. त्यांनी संदीप यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा केला. तेथून फिर्यादी संदीप यांनी स्वतःची सुटका करून घेतली. याबाबतचा गुन्हा पेठवडगाव पोलिस ठाण्यात दाखल केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी तपास करून सरकारी कामात अडथळेसह खुनाचा प्रयत्न केल्याची कलमे लावून गुन्हा दाखल केला.

सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासले. साक्षीदार योगेश पाडळे व पंच गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. अन्य साक्षीदार फितूर झाले. एमएसईबीचे असि. अकाऊंटंट यांनी सरकार पक्षाला अंशतः मदत करून आरोपी आवळे यांना ओळखले. न्यायालयात झालेल्या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने आज शिक्षा सुनावली; तर स्थानिक वाहिनीचे पत्रकार अनिल उपाध्ये यांची साक्ष घेण्यात आली. ते फितूर झाल्यामुळे त्यांना सरकार पक्षातर्फे फितूर घोषित केले. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची मुदत दिली असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले. कोणीही सरकारी कार्यालयावर हल्ला केल्यास काय घडू शकते, हे दाखविणारा आजचा निकाल असल्याचे मत ॲड. पाटील यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com