क्रेनने उचललेल्या दुचाकीतून पेट्रोल चोरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - गांधीनगरातील वाहतूक शाखेच्या क्रेनने उचललेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल चोरण्याचा प्रकार आज उघडकीस आला. एका नागरिकाने हा प्रकार थेट "आयजी 100' या व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरून उघड केला आहे. 

कोल्हापूर - गांधीनगरातील वाहतूक शाखेच्या क्रेनने उचललेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल चोरण्याचा प्रकार आज उघडकीस आला. एका नागरिकाने हा प्रकार थेट "आयजी 100' या व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरून उघड केला आहे. 

पोलिस आणि त्यांचा कारभार नेहमीच टीकेचा विषय ठरतो. यात आता आणखी भर पडली आहे. गांधीनगरातील पोलिसांच्या क्रेनवरील मोटारसायकलीचे पेट्रोल काढून घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. क्रेनवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यातील पेट्रोल काढण्यासाठी मिनरल वॉटरची बॉटल लावली आहे. दोन कर्मचारी आहेत. क्रेनवरच हा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. तो कोणाला दिसू नये म्हणून त्यांपैकी एक जण दुचाकीवर बसलेला आहे तर दुसरा हा प्रकार दिसू नये अशा पद्धतीने पुढे उभा असल्याचे लक्षात येते. याचा फोटो सहज पाहिल्यावर काहीच दिसून येत नाही; मात्र तो झूम केल्यानंतर पेट्रोलची टाकी खाली तिरकी करून बॉटल लावल्याचे दिसून येते. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी कोल्हापुरात पदभार स्वीकारल्यावर त्यांनी "आयजी 100' हा व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, पत्रकार, वकिलांचा समावेश आहे. गल्लीबोळात काय घडते, याची माहिती या ग्रुपवर मिळावी, यासाठी त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. याच ग्रुपवर एका व्यक्तीने हा फोटो अपलोड केला. या ग्रुपच्या नियमानुसार तातडीने त्याचे उत्तर दिले जाते. किंबहुना त्याचे पुढे काय झाले, हेसुद्धा सांगितले जाते. हा फोटो पाहिल्यावर ऍडमिन असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तर देऊन याचे खंडन केले आहे. 

"आयजी 100' ग्रुपच्या ऍडमिनचा खुलासा 
""याबाबत शहानिशा केली असता ही क्रेन गांधीनगर पोलिस ठाणे हद्दीतील आहे. फोटोमधील दुचाकीचा अपघात झालेला होता. त्यामुळे तिची पेट्रोल टाकी फुटून पेट्रोल गळत होते. ती टाकी रिकामी करण्यासाठी बाटली लावलेली आहे.''

Web Title: kolhapur news petrol whatsapp