पाणकावळे शहराच्‍या दिशेने

अमोल सावंत
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - तलावात मधोमध असणाऱ्या खडकावर माशाची प्रतीक्षा करत पंख पसरून एखाद्या रोमन योद्ध्याप्रमाणे बसणाऱ्या धाकट्या पाणकावळ्यांनी (लिटिल कॉर्मोरंट) विणीचा हंगाम अन्‌ अधिवासासाठी शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेली झाडे निवडली आहेत. विशेष म्हणजे, हे पाणकावळे अलीकडे मोठ्या प्रमाणात शहराच्या भागात दिसत आहेत. 

कोल्हापूर - तलावात मधोमध असणाऱ्या खडकावर माशाची प्रतीक्षा करत पंख पसरून एखाद्या रोमन योद्ध्याप्रमाणे बसणाऱ्या धाकट्या पाणकावळ्यांनी (लिटिल कॉर्मोरंट) विणीचा हंगाम अन्‌ अधिवासासाठी शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेली झाडे निवडली आहेत. विशेष म्हणजे, हे पाणकावळे अलीकडे मोठ्या प्रमाणात शहराच्या भागात दिसत आहेत. 

हे पाणकावळे नदीकाठ, तलाव, डबके, पाणथळ जागा, धरणाचे क्षेत्र, खाडीलगतचे प्रदेश येथे आढळतात; मात्र पाणकावळ्यांनी सीपीआर आवारातील झाडांवर, सिद्धाळा गार्डन, शहरात अन्यत्र अधिवास केल्याने पक्षी निरीक्षकांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पाणकावळ्यांचा अधिवास, विणीचा हंगाम हा पाणथळ जागीच व्हायला हवा. तरीही हे पक्षी शहरात येऊन विणीचा हंगाम पार पाडत आहेत. त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी निरीक्षण, अभ्यासाची गरज असल्याचे अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी सांगितले. 

असा हा पाणकावळा 

  •  फॅलोक्रोकॉरेक्‍स निगर असे शास्त्रीय नाव
  •  चोचीचा पुढील भाग वक्राकार, मान लांब असते
  •  कुबड काढून झाडांच्या फांदीवर, खडकांवर बसतो. 
  •  विणीच्या हंगामात नराला निळसर हिरवट काळा रंग, नकळत तुरा येतो 
  •  मासे, बेडूक, बेडकाची पिल्ले हे खाद्य 
  •  पाण्यात बदकांप्रमाणे दिसतात; मात्र बारीक मानेवरून वेगळेपण जाणवते
  •  पाण्यात १० मीटर सूर मारून मासे पकडतो
  •  थोरला अन्‌ धाकटा असे दोन प्रकार
  •  थोरला बदकाएवढा; तर धाकटा डोमकावळ्याएवढा असतो

पक्षीतज्ज्ञ म्हणतात
न्यू पॅलेस तलाव, रंकाळा, पंचगंगा नदीपासून एक ते दोन किलोमीटरवर हे पाणकावळे शहराच्या मध्यवर्ती भागात अधिवास करून आहेत. नवजात पिलांना खाद्य देणे, पिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी, शिकाऱ्यांपासून धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी गजबजलेल्या ठिकाणी जागा निवडली असावी, असा अंदाज पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केला. सीपीआर आवारातील बागेतील झाडांवर दुरून पाहिले तर, हे पाणकावळे सामान्य कावळ्यांसारखे दिसतात. 

कॉमर्स कॉलेजसमोरील वडाचे झाड, रुईकर कॉलनीतील निलगिरींच्या झाडांवरही अनेक पाणपक्ष्यांनी घरटी केली आहेत. सीपीआर आवारातील बागेतील अशोक, महोगनी, भद्राक्ष या झाडांवर पाणकावळ्याची पालापाचोळ्यापासून तयार केलेली १५ ते २० घरटी असून जोड्या जमविणे, पिलांचे संगोपन करणे, सामुहिकपणे कलकलाट करताना ते दिसतात.
- सुहास वायंगणकर,
पक्षीतज्ज्ञ

Web Title: Kolhapur News Phalacrocorax niger seabirds special story