व्यायामाचे ज्ञानकोश आता "पीडीएफ' स्वरूपात...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कोल्हापूर - शारीरिक शिक्षण क्षेत्रातील विविध संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त असणारे आणि "लोकल' टू "ग्लोबल' अशा सर्व प्रकारच्या व्यायामांची माहिती एकत्र असणाऱ्या "व्यायामाचा ज्ञानकोश' पुनर्मुद्रित करण्यासाठी येथील प्रा. श्रीपाल जर्दे यांचा शासनाबरोबर एकाकी लढा सुरू आहे. शासनाबरोबरच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता या ज्ञानकोशांची संगणकीय प्रतिमा (पीडीएफ) करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी हे दुर्मिळ ग्रंथ ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोल्हापूर - शारीरिक शिक्षण क्षेत्रातील विविध संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त असणारे आणि "लोकल' टू "ग्लोबल' अशा सर्व प्रकारच्या व्यायामांची माहिती एकत्र असणाऱ्या "व्यायामाचा ज्ञानकोश' पुनर्मुद्रित करण्यासाठी येथील प्रा. श्रीपाल जर्दे यांचा शासनाबरोबर एकाकी लढा सुरू आहे. शासनाबरोबरच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता या ज्ञानकोशांची संगणकीय प्रतिमा (पीडीएफ) करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी हे दुर्मिळ ग्रंथ ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, पाच हजार पानांचे आणि साडेसहा हजारांवर चित्रांचा समावेश असलेल्या या ज्ञानकोशाचे दहा खंड दुर्मिळ झाले असून, त्याच्या पुनर्मुद्रणासाठी त्यांचा राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. 

मल्लखांब विद्येचे आद्य प्रवर्तक बाळंभट्टदादा यांचे शिष्य सरदार श्रीमंत दत्तात्रय चिंतामण ऊर्फ आबासाहेब मुजुमदार (करंदीकर) यांनी 1931 मध्ये वयाच्या 49 व्या वर्षी बडोदा संस्थानची सरदार पदाची नोकरी सोडली आणि जगभरातील व्यायामप्रेमींसह विविध संस्थांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी व्यायाम ज्ञानकोशाच्या दहा खंडांचे पहिल्यांदा मराठी भाषेत संपादन करून ते प्रकाशित केले. पुढे हिंदी, गुजराती, इंग्रजीतही खंडांचे प्रकाशन झाले; मात्र त्यासाठीचा खर्च पेलवत नसल्याने त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र पिंजून काढला आणि प्रकाशनासाठीचा निधी जमा केला. त्यातून 1936 ते 1949 या काळात दहा खंड प्रकाशित केले. 

सामान्य व्यायामप्रेमींना हा ज्ञानकोश जितका मार्गदर्शक आहे, तितकाच तो शारीरिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि संशोधकांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचा आहे; मात्र या क्षेत्रातील अनेकांना याविषयी माहिती नाही. शेवटचा खंड 66 वर्षांपूर्वी प्रकाशित झाला असल्याने प्रसिद्धी हक्क कायद्यानुसार परवानगी न घेता शासनाला हे खंड प्रकाशित करता येऊ शकतात, अशी मागणी प्रा. जर्दे यांनी शासनाकडे वारंवार लावून धरली होती. शासनाच्या भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेमार्फत हे काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या ज्ञानकोशात काय ? 
- वेदकाळ, रामायण, महाभारत, मुस्लिम राजवट, मराठ्यांचा काळ, पेशवाईपासून ब्रिटिश कालखंडातील व्यायामांच्या प्रकारांची सचित्र माहिती व त्यांच्या लाभाविषयी विस्तृत विवेचन. 
- अर्भकाच्या व्यायामापासून देशी-विदेशी खेळ, लहान मुलांचे साठहून अधिक पारंपरिक खेळ, मुलींसाठीचे पन्नासहून अधिक पारंपरिक खेळ, देशी-विदेशी कसरतींचे प्रकार, मैदानी व मर्दानी खेळांची माहिती. 
- प्रत्येक खंड साडेचारशे ते साडेपाचशे पानांचा. प्रत्येक खंडात साडेतीनशेहून अधिक चित्रांचा समावेश. 

Web Title: kolhapur news Physical Education gym