कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे

बाळासाहेब कांबळे
गुरुवार, 22 जून 2017

पट्टण कोडोली गावाची श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यात ख्याती आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात श्री विठ्ठल बिरदेवाची मोठी यात्रा भरते. गावात यापूर्वी अनेकदा जातीय दंगली झाल्या आहेत.

हुपरी : पट्टण कोडोली (जि. कोल्हापूर) येथे चौकाचौकात डिजीटल फलकांवर उभे असलेले अण्णा, दादा, बापू, भाऊ आदींसह खंबीर नेते आणि सामाजिक सलोखा बेरंग करणारे अनेक रंगी झेंडे हुपरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच बुधवारी रातोरात हटविण्यात आले. 

पट्टण कोडोली गावाची श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यात ख्याती आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात श्री विठ्ठल बिरदेवाची मोठी यात्रा भरते. गावात यापूर्वी अनेकदा जातीय दंगली झाल्या आहेत. अलिकडच्या काळात राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याकडून ईर्षेने चौका चौकात रस्त्यावरच तथाकथित नेत्यांची छबी असलेले डिजीटल फलक लावण्यात आले होते. तसेच बस स्थानक परिसरात भक्कम पाईप रोवून विविध रंगी झेंडे एकमेका शेजारी 'डौलात' उभे होते. या मुळे तरूणांत वाद निर्माण होत होते. या कडे ग्राम पंचायत, पोलिस तसेच नेते मंडळींकडून सोईस्कर दुर्लक्ष केले जात होते.

मात्र, हुपरी पोलिस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी गावातील लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन संवाद साधला. या वेळी त्यांनी बेकायदेशीर डिजीटल फलक आणि झेंडे संबंधितानी काढून न घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे गावातील डिजीटल फलक आणि झेंडे पटापट हटले गेले. गावातील सामाजिक सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरणार्‍या 'मुळा' वरच पोलिसांनी घाव घातल्याने समाधान व्यक्त होत आहे. हुपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका, गावठी दारू, न्यायालयीन आदेश डावलून सुरू असलेल्या बेकायदेशीर परमीट रूम आणि बीअर बार या बरोबरच बेकायदेशीर डिजीटल फलक, झेंडे यावर कारवाई करण्याचा सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा धडाका सुरूच आहे.

Web Title: Kolhapur news police action in Pattan Kodoli village digital posters