हे पोलिसपाटील की पुढारी?

सुधाकर काशीद
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पोलिसपाटील हे सरकारी सेवेतले एक निःपक्षपाती पद; पण हे पद राजकीय ईर्षेतून मिळवल्यासारखे जंगी वातावरण गावागावांत तयार झाले आहे. एखादा सरपंच जसा एखाद्या राजकीय गटाचा असतो तसा पोलिसपाटीलही आता उघड उघड राजकीय गटाचा शिक्का घेऊन मिरवू लागला आहे. 

कोल्हापूर - यांच्या निवडीचे डिजिटल फलक गावातील मुख्य ठिकाणी लागले आहेत... डिजिटल फलकावर यांच्या छायाचित्राबरोबरच राजकीय नेत्यांचीही ठळक छायाचित्रे आहेत... याही पुढे जाऊन गावागावांत फेटे बांधून यांच्या मिरवणुका निघत आहेत... एखाद्या राजकीय किंवा सहकार क्षेत्रातील निवडीबद्दल असे वातावरण असेल तर ते क्षणभर ठीक आहे; पण हे फलक, या मिरवणुका नवनियुक्त पोलिसपाटलांसाठी निघत आहेत. पोलिसपाटील हे सरकारी सेवेतले एक निःपक्षपाती पद; पण हे पद राजकीय ईर्षेतून मिळवल्यासारखे जंगी वातावरण गावागावांत तयार झाले आहे. एखादा सरपंच जसा एखाद्या राजकीय गटाचा असतो तसा पोलिसपाटीलही आता उघड उघड राजकीय गटाचा शिक्का घेऊन मिरवू लागला आहे. 

पोलिसपाटील हा महसूल व पोलिस खात्याचा एक दुवा म्हणून काम करतो. त्याची निवड रीतसर प्रांताधिकाऱ्याकडून मुलाखत घेऊन होते. त्यापूर्वी लेखी परीक्षा द्यावी लागते. पोलिसपाटलाला तीन हजार रुपये मानधन मिळते. गाव पातळीवरचे हे पद असल्याने व पोलिसपाटलाचा वावर गावात सर्व पातळीवर असल्याने गावाची नस त्याला कळालेली असते. गावात काय घडलंय किंवा काय घडणार आहे. याचा बऱ्यापैकी अंदाज त्याला असतो. एखादी माहिती पोलिसापर्यंत खूप उशिरा पोचते, पण पोलिसपाटलापर्यंत ही माहिती या ना त्या मार्गाने लगेच पोचते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही माहिती उपयोगी पडते. महसुलाच्या गावपातळीवर एखाद्या कारवाईसाठी, मोहिमेसाठीही पोलिसपाटलाची मदत घेतली जाते. एखाद्या गुन्ह्याबद्दल पोलिसपाटलाकडून पोलिसांना मिळणारी माहिती तपासात खूप उपयोगी ठरणारी असते. 

अर्थात हे काम पोलिसपाटलाने निःपक्षपातीपणे करावे, अशीच अपेक्षा असते; मात्र आता पोलिसपाटील पदाच्या निवडी पाहता या पोलिसपाटलानीच आपले अभिनंदनाचे फलक स्वखर्चाने उभे केले आहेत. त्यावर उघड-उघड समर्थ साथ, भक्कम आधार म्हणून गावातील, जिल्ह्यातील नेत्यांची छायाचित्रे आहेत. त्याला सरळ-सरळ अर्थ असा निघू शकतो की, या पोलिसपाटलाच्या निवडीसाठी या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत किंवा हा पोलिसपाटील या नेत्यांच्या प्रभावाखाली आहे. वास्तविक पोलिसपाटील हा मानधनावरचा शासकीय सेवक. त्याला आपले डिजिटल फलक लावता येत नाहीत.

राजकीय नेत्यांशी सलगी करता येत नाही; पण गावागावांत उघड-उघड राजकीय पुढाऱ्यांबरोबर पोलिसपाटील डिजिटल फलकावर झळकू लागले आहेत. गावातील एखाद्या बेकायदा कृत्याची पहिली खबर पोलिसपाटलाने पोलिसांना द्यायची असते. या पार्श्‍वभूमीवर या पोलिसपाटलांच्याच बेकायदा डिजिटल फलकांची, राजकीय पुढाऱ्यासोबत मिरवणुकांची तक्रार कोण करणार, हाच खरा प्रश्‍न आहे. 

गावातील मानाचे व जबाबदारीचे पद
पोलिसपाटील हे केवळ शासकीय पद नाही; पण ग्रामीण भागातील लोक जीवनात त्याला मानाचे स्थान आहे. गावातील जत्रा, उरुसात पोलिसपाटलाला आजही खूप मान आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर पन्हाळ्यातील पोलिसपाटलाकडे तेथील महालक्ष्मीचे नवरात्रातील महत्त्वाचे दागिने, साधोबा उरुसातील सोन्याचा नारळ असतो. त्या त्या समारंभात पोलिसपाटील ते सोहळ्यासाठी देतो. पालखी व गलेफलाही पहिला खांदा पोलिसपाटीलच देतो.

Web Title: Kolhapur News Police Patil or politcal leader