फेटा बांधून पोलिस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

राजारामपुरी ठाण्यात उपक्रम - धकाधकीच्या नोकरीत आणला आनंदी क्षण

कोल्हापूर - पोलिस म्हटलं की ‘ऑन ड्युटी २४ तास’ हे समीकरण समोर येतं. ही नोकरीच तशी आहे. त्यामुळे कर्तव्य निभावताना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना सणवारादिवशीही ड्युटीवर राहावे लागते. बऱ्याचदा कुटूंबासोबत, नातेवाईकांसोबत त्यांच्या आनंदात सामिल होता येत नाही.

राजारामपुरी ठाण्यात उपक्रम - धकाधकीच्या नोकरीत आणला आनंदी क्षण

कोल्हापूर - पोलिस म्हटलं की ‘ऑन ड्युटी २४ तास’ हे समीकरण समोर येतं. ही नोकरीच तशी आहे. त्यामुळे कर्तव्य निभावताना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना सणवारादिवशीही ड्युटीवर राहावे लागते. बऱ्याचदा कुटूंबासोबत, नातेवाईकांसोबत त्यांच्या आनंदात सामिल होता येत नाही.

त्यांच्या वाढदिवसाबाबतही हीच स्थिती उद्‌भवते. वाढदिनी सुट्टी मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे वाढदिवस हा तसा अनेक पोलिसांच्या नशिबी बऱ्याचदा नसतोच. राजारामपुरी पोलिस ठाण्यात मात्र वाढदिवस कायम लक्षात राहिल अशा पद्धतीने साजरा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. 

पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या प्रोत्साहनाने सुरू झालेला हा उपक्रम पोलिसांचे मनोधैर्य वाढवत आहे. पोलिस सुद्धा माणूस आहे. त्यालाही हौसमौज आहे. त्यामुळे रोजच्या धकाधकीतून पोलिस कर्मचाऱ्याला थोडं बाजूला काढण्याचा प्रयत्न त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे होत आहे. नुकतेच एका पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा झाला.

वाढदिनानिमित्त त्याला कोल्हापुरी फेटा बांधला होता. एरवी करारी बाण्याने पाहणारा तो पोलिस त्या दिवशी सर्वांना आपुलकीने बोलवत होता. 
पोलिस अधीक्षकांकडून वाढदिवसापूर्वी साधारण आठ-दहा दिवसआधी पोलिस ठाण्यात पत्र येते. ते थेट बारनिशीत जमा होते. त्यानंतर वाढदिनादिवशी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला ते दिले जाते. मात्र राजारामपुरी पोलिसांनी त्याला आणखी आनंदाची झालर देण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी ज्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस आहे त्याचे नाव नोटीस बोर्ड लिहिले जाते. कोणत्या वर्षात पदार्पण त्याचाही उल्लेख तेथे असतो. बोर्डवर पुष्पगुच्छ रेखाटून शुभेच्छा दिल्या जातात. निरीक्षक साळुंखे यांनी कोल्हापुरी फेटा आणला आहे. वाढदिवस असेल त्याला तो रात्री हजेरी वेळी घातला जातो. मनोगत व्यक्त केले जाते. फोटो काढले जातात. बरोबरच्या सहकाऱ्यांकडून वर्गणी काढून आणलेला केक कापला जातो. पोलिस अधीक्षकांनी पाठविलेले शुभेच्छा पत्रही याच कार्यक्रमात दिले जाते. पोलिस खात्याला अभिमान वाटेल असे काम होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या जातात.

राजस्थानी पगडी... कोल्हापुरी फेटा...
इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना पोलिस निरीक्षक श्री. साळुंखे यांनी तेथे राजस्थानी पगडी विकत घेतली होती. वाढदिवस असेल त्या कर्मचाऱ्याला ती घातली जायची. हाच उपक्रम त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात राबवताना पगडीऐवजी कोल्हापुरी फेटा आणला आहे.

जेथे रिमांड होतो त्याच ठाण्यातील या कार्यक्रमाने वातावरण बदलत आहे. आपुलकीची आणि खाकी वर्दीशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती तयार होत आहे. पोलिस ठाण्यातही काही क्षण आनंदाचे वातावरण यातून होत आहे.
- संजय साळुंखे, पोलिस निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे

Web Title: kolhapur news Police personnel's birthday, tied to pheta