चोरीला गेलेले ५५ तोळे सोने... सव्वा लाख मिळाले परत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  ‘साहेब चोरीला गेलेले सोने, आम्हाला परत मिळवून देऊन दिवाळीची अनोखी भेट दिली. खाकी वर्दीबाबतचा गैरसमज आज दूर झाला. आम्ही तुमचे आभारी आहोत.’ चोऱ्या, घरफोड्या आणि चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी तुम्ही गस्त घाला, आम्हीही सतर्क राहतो... अशा प्रतिक्रिया नागरिकांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासमोर व्यक्त केल्या. 

कोल्हापूर -  ‘साहेब चोरीला गेलेले सोने, आम्हाला परत मिळवून देऊन दिवाळीची अनोखी भेट दिली. खाकी वर्दीबाबतचा गैरसमज आज दूर झाला. आम्ही तुमचे आभारी आहोत.’ चोऱ्या, घरफोड्या आणि चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी तुम्ही गस्त घाला, आम्हीही सतर्क राहतो... अशा प्रतिक्रिया नागरिकांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासमोर व्यक्त केल्या. 

जिल्ह्यात घरफोडी-चोरी करणाऱ्या चड्डी बनियन टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ५४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यांच्याकडून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल आज न्यायालयाच्या आदेशानुसार १६ फिर्यादी नागरिकांना परत दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 

चोरट्यांकडून जप्त केलेले ५५ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख २० हजारांची रोकड, असा १७ लाखांचा ऐवज संबंधित गुन्ह्यातील फिर्यादींना परत दिला. पोलिस अधीक्षक मोहिते, पोलिस गृह उपअधीक्षक सतीश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, प्रवीण चौगुले यांच्या हस्ते ऐवज संबंधितांना परत दिला. याप्रसंगी केशवराव देशपांडे म्हणाले, ‘‘पोलिसांनी अथक प्रयत्न करून चोरट्यांचा छडा लावला. दिवाळीपूर्वी चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देऊन अनोखी दिवाळी भेट दिली.’’ बाळासाहेब सोमन म्हणाले, ‘‘चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी दोन महिन्यांत परत मिळवून दिला. त्यांचे आभार मानायला शब्दही अपुरे पडतात.’’ 

उदय लांबोरे म्हणाले, ‘‘मी तलाठी आहे. १४ एप्रिलला चावडीला लावलेले कुलूप तोडून चोरट्याने ५० हजारांची शासकीय रक्कम चोरट्यांच्या हाती लागली. आमचेही कर्मचारी गाफील राहिले. त्यांनी कपाटाची चावी ड्राव्हरमध्ये ठेवली. आता आम्हीही सतर्क राहतो. तुम्हीही गस्त घाला.’’

दागिने, पैसे दिलेल्यांची नावे (मुद्देमाल व रक्कम)                 
मंगल माळी (५ तोळे दागिने), मनीष मजली (१८ हजार), मंगल घाटगे (१० तोळे) बाळासाहेब सोमन (५ ग्रॅम), संदेश करनावळ (६० हजार, सुशांत पोवार (१० तोळे दागिने), विशाल पटवर्धन (सव्वा तोळे) , विवेक कुलकर्णी (२२ ग्रॅम), अमित लंबे (साडेसात तोळे), शंकर घुगरे (साडेसात तोळे), उदय लांबोरे (१२ हजार), कुमार कोळी (३० हजार), वर्षा जाधव (अडीच तोळे), भरत इंगळे (सव्वा तोळे), सुनीता पाटील (अडीच तोळे), सुप्रिया देशपांडे (साडेतीन तोळे).

दिवाळी सुटीला बाहेरगावी जाताना निदान याची माहिती शेजाऱ्यांना द्या. उन्हाळी, दिवाळी आणि नाताळ सुटीत बंद घरे फोडण्याचे प्रमाण जास्त असते. याबाबत नागरिकांनी सतर्कता घ्यावी.’’
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

खाकी वर्दीबाबत अनेक गैरसमज होते, ते आज दूर झाले. त्यातही माणूस दडलेला असतो. चोरट्याकडून जप्त केलेला मुद्देमालही परत देतो, हेही समजले.’’
- मंगल माळी, सोने परत मिळालेली महिला

Web Title: Kolhapur News Police returned stolen goods to the owners