पोलिस नसणार आता हरकाम्या

सुधाकर काशीद
सोमवार, 11 जून 2018

कोल्हापूर - पोलिस कॉन्स्टेबल म्हणजे हरकाम्या नोकर नाही. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस कॉन्स्टेबलना चारचौघांत अपमानास्पद भाषा वापरायची नाही, ही भूमिका सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पोलिस आत्मसन्मान योजना कोल्हापूर परिक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

कोल्हापूर - पोलिस कॉन्स्टेबल म्हणजे हरकाम्या नोकर नाही. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस कॉन्स्टेबलना चारचौघांत अपमानास्पद भाषा वापरायची नाही, ही भूमिका सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पोलिस आत्मसन्मान योजना कोल्हापूर परिक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

रोजच्या कामातील काही अडचणी, त्रास याचा सगळा राग पोलिस कॉन्स्टेबलवर काढायची अनेक अधिकाऱ्यांना सवय असते, आणि अशा अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद बोलण्याने कॉन्स्टेबलचे मानसिक खच्चीकरण होते, म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे. 

पोलिस त्याच्या कामात चुकला तर त्याला बोलण्याचा अधिकार अधिकाऱ्याला जरूर आहे. पण, चारचौघात नको ती भाषा वापरून, आपले वर्चस्व दाखविण्याची काही अधिकाऱ्यांची सवय पोलिस कॉन्स्टेबलना त्रासदायक ठरते, असा अनुभव आहे. अशा बोलण्यातून कॉन्स्टेबल सुधारत नाही; पण त्याची त्याच्या वरिष्ठांबद्दल, त्याने दिलेल्या आदेशाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. आणि त्याचा कामकाजावर परिणाम होतो. 

अलीकडच्या काही वर्षांत पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले तरुण केवळ बारावी पास नाहीत, तर बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.एस्सी. आहेत. काही जण स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे आहेत. संगणकाचे चांगले ज्ञान असणारे आहेत. पण, काही वरिष्ठांना त्याच्याशी सोयरसुतक नसते. ते कॉन्स्टेबलना चारचौघांत काहीही बोलतात. काहीही काम करायला लावतात. उलट उत्तर द्यायचे नाही, ही पोलिस खात्याची शिस्त म्हणून ते अपमान गिळतात.

ज्यांचे समाजात नको ते उद्योग सुरू असतात. पण, प्रतिष्ठितपणाचा बुरखा पांघरून ते वरिष्ठांसमोर खुर्चीत बसलेले असतात. त्यांना पाण्याचा ग्लास, चहाचा कप या कॉन्स्टेबलना द्यावा लागतो. वास्तविक, ज्यांच्या कॉलरला पोलिसांनी हात घालण्याची गरज असते, त्यांना नाईलाजाने पाहुणचार करायची वेळ कॉन्स्टेबलवर येते. त्यामुळे पोलिसांचा दरारा कमी होतो. त्याचा परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर होतो. 

पोलिसांना अधिकाऱ्यांनी घरातले काम सांगायचे नाही, असा काटेकोर नियम आहे. पण, काही पोलिस घरकामासाठीच वापरले जातात. हे जाहीर आहे. आणि इतर जबाबदारीचे काम न करता अधिकाऱ्याच्या घरचे काम करून आपले सर्व्हिस बुक चांगले करून घेणारे काही कॉन्स्टेबलही आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आत्मसन्मान योजना मनापासून राबवली गेली, तर पोलिसांचे मनोधैर्य वाढवणारी ठरणार आहे. 

Web Title: Kolhapur News Police Self-Control Plan special