कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणी झाली डिजिटल

राजेश मोरे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पेपरलेस कामकाज - डायरीसह सर्व नोंदी ऑनलाईन

कोल्हापूर - तंत्रज्ञानाच्या युगात ‘हम भी किसीसे कम नहीं...’ हे कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने दाखवून दिले. आज थेट संगणक, लॅपटॉपवर पोलिस कर्मचारी तक्रार नोंद करण्यापासून ठाण्यातील प्रत्येक काम करू लागलेत. पेपरलेस कामकाजामुळे पोलिस ठाण्यांना डिजिटल लूक प्राप्त होत आहे.

पेपरलेस कामकाज - डायरीसह सर्व नोंदी ऑनलाईन

कोल्हापूर - तंत्रज्ञानाच्या युगात ‘हम भी किसीसे कम नहीं...’ हे कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने दाखवून दिले. आज थेट संगणक, लॅपटॉपवर पोलिस कर्मचारी तक्रार नोंद करण्यापासून ठाण्यातील प्रत्येक काम करू लागलेत. पेपरलेस कामकाजामुळे पोलिस ठाण्यांना डिजिटल लूक प्राप्त होत आहे.

संगणकीय युगात पोलिस ठाणेही डिजिटल करण्याची संकल्पना पुढे आली. पोलिस ठाण्याच्या ऑनलाईन कामकाजाला प्रत्यक्षात २५ जून २०१५ ला सुरवात झाली. संगणकावर काम करण्याची धास्ती पहिल्यांदा अनेक पोलिसांनी घेतली. ‘ते काम सोडून बोला साहेब, आणखी चार कामे जास्त करतो...’ असा सूर त्यांच्यातून उमटू लागला होता. त्यामुळे सुरवातीच्या काळात ठराविक पोलिसांनाच ते काम करावे लागले; मात्र संगणकीय काम ही काळाची गरज आहे. त्यावर प्रत्येकाने काम केलेच पाहिजे. हे सर्व पोलिसांच्या लक्षात आले. सध्या पोलिस ठाण्याचे कामकाज ‘सीसीटीएनएस’ (क्राईम ॲन्ड क्रिमिनल ट्रॅर्किंग ॲन्ड  नेटवर्किंग सिस्टीम) या प्रणालीवर चालते. पोलिस मुख्यालयात स्वतंत्र संगणकीय विभागाची सुरवात केली. त्यानंतर १९९८ ते २०१५ पर्यंतचा डाटा त्यावर फिड केला.

जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. हे प्रशिक्षण अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिलावर शेख, सुदर्शन कांबळे, कविता पाटील, संदीप पाटील आणि विनायक डोंगरे यांच्यामार्फत दिले जाते.

आतापर्यंत २८ पोलिस ठाण्यातील २७३८ पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले. इतकेच नव्हे तर पोलिस ठाण्यात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने कामही करण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर एकतर संगणक अगर लॅपटॉप दिसू लागला आहे. यात सुधारणा म्हणून पोलिस प्रशासनाने नागरिकांसाठी पोलिस दलातील माहिती ‘सिटीझन पोर्टल’द्वारे खुली केली आहे.

प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी - २७३८
पोलिस अधीक्षक     ३
अपर पोलिस अधीक्षक     ६
पोलिस उपअधीक्षक     २८
पोलिस निरीक्षक     १२
सहायक पोलिस निरीक्षक     ६४
उपनिरीक्षक     २०२
सहायक फौजदार     ११८५
हेड कॉन्स्टेबल     २३७
पोलिस नाईक आणि पोलिस कर्मचारी    १००१

संगणकीकृत नोंदीचा तपशील
(१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ अखेर)

प्रथम खबर अहवाल (एफआयआर)      ६४७५
गुन्ह्यांचा तपशील      ५३४९
अटक आरोपी      ३२८२
जप्त केलेला मुद्देमाल      २०२९
न्यायालयात पाठवलेले चार्जशीट      १७२५
तसेच केस डायरी, अदखलपात्र गुन्हे, मृत, गहाळ, मिसिंग असे
१४ फॉर्म आॅनलाईन भरले जातात.

Web Title: kolhapur news police station digital