पोलिस खरचं मटका बंद करणार?

पोलिस खरचं मटका बंद करणार?

कोल्हापूर - जिल्ह्यातला मटका पोलिसांनी खरोखरच बंद करायचा ठरवला तर ते फक्‍त तासाभराचे काम आहे. ‘मला असले धंदे चालणार नाहीत.’ असं वरिष्ठांनी नुसतं म्हटलं तरी मटका बंद करायला डी.बी., एल.सी.बी.ची यंत्रणा धावत सुटली पाहिजे, असा पोलिस खात्याचा शिरस्ता आहे. पण कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर ‘या साऱ्या कारवाईच्या आड अडकाअडकी आहे.’ जे पोलिस एरव्ही मटक्‍याची बुक्‍की डोळ्यासमोर दिसत असूनही तिकडे डोळेझाक करतात. त्यांच्याकडून मटका बंद कसा होऊ शकणार, हाच खरा प्रश्‍न आहे. त्यामुळेच तथाकथित मटका किंगना हद्दपार केल्याची घोषणा झाली असली तरी मटका चालू ठेवण्याचे धाडस इतर मटका सम्राटात आहे.

मटकावाल्यांना हद्दपार केले म्हणजे मटका थांबेल, या समजूतीत काही वरिष्ठ आहेत. जणू काही फार मोठी पाळेमुळे उखडून काढली, असा कारवाईचा गवगवा होत आहे. पण वास्तव अगदी उघड आहे. मटकेवाला, जुगारवाला पोलिसाला घाबरतच नाही. ही वस्तुस्थिती आहे. या चार पाच महिन्यातच हे घडले असे, अजिबात नाही. कारण मटका रूजायला किंबहुना कोल्हापूरातल्या काही प्रतिष्ठितांचा मटका हा साईड बिझनेस व्हायला पोलिसांचा कानाडोळा हेच प्रमुख कारण आहे. 

मटका बंद करायचा झाला तर पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच मटका मालकांच्या गळपट्टीला हात घालण्याची गरज आहे. जसा प्रत्येक पोलिस ठाण्याला एक निरीक्षक असतो. तशा पद्धतीने मटका मालकांनी आपली हद्द वाटून घेतली आहे. कारवाई कशी थांबवायची याची कला मटका चालकांना आहे. वरचा साहेब कितीही कडक असला तरी खालती कसे पोखरायचे याचे एक तंत्रच त्यांनी सांभाळले आहे. आता हद्दपार झालेल्या विजय पाटील या मटका चालकाने हे तंत्र चॅनेलसमोर मुलाखती देऊन जगासमोर आणले आहे.  हद्दपार या शब्दाची भिती, या मटका चालकाने गुंडाळून ठेवली आहे.  त्याच्या बरोबरीने इतर मटका चालक रेकॉर्डवर न येता अपापल्या हद्दी आजही सांभाळत आहेत. 

मटका बंद केवळ फार्सच ठरणार
वास्तविक कोल्हापूर शहरात, जिल्ह्यात किती मटका बुक्‍की, कोण कोण चालक, कोण कोण भागिदार, मटका बुक्‍की कोणत्या गल्लीत, कोणत्या बोळात, तिथले कलेक्‍शन किती, हे सारे डी. बी., एल. सी. बी. ला माहित आहे. पोलिसांना हे सगळे माहित असून ते कानाडोळा का करतात, हे कोल्हापूरकरांना माहिती आहे. त्यामुळे मटक्‍यावरील कारवाई चेष्टेचा विषय आहे. 

पोलिसांना हे चित्र बदलण्याची जरूर संधी आहे. काल परवाचे टुकार समजले जाणारे हे मटकेवाले आज पैशाने गब्बर झाले आहेत. हजारो लोकांचे संसार त्यांनी काही पोलिसांना व्यवस्थित सांभाळून मटका जुगाराच्या पायी धुळीस मिळवले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी फक्‍त तासाचा अवधी आवश्‍यक आहे. पण पोलिसांनी मनापासून केलं तरच हे शक्‍य आहे. नाहीतर मटका बंद हा केवळ फार्सच ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com