मंडलिकांपेक्षा सतेज-मुश्रीफ यांचीच घाई

निवास चौगले
मंगळवार, 13 मार्च 2018

कोल्हापूर - आगामी लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेकडूनच लढवणार, असे एकदा नव्हे तर अनेकदा प्रा. संजय मंडलिक यांनी जाहीर केले, तरीही काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मात्र प्रा. मंडलिक यांनाच खासदार करण्याची घाई झाली आहे.

कोल्हापूर - आगामी लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेकडूनच लढवणार, असे एकदा नव्हे तर अनेकदा प्रा. संजय मंडलिक यांनी जाहीर केले, तरीही काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मात्र प्रा. मंडलिक यांनाच खासदार करण्याची घाई झाली आहे. पक्षापेक्षा मुश्रीफ, सतेज आणि महाडिक या तिघांच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या ट्रॅंगलमध्ये जिल्ह्याचे राजकारण अडकले आहे. याला मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे संदर्भ आहेत. 

सतेज-मुश्रीफ या जोडीची महाडिक आणि कंपनी राजकीय शत्रू आहे. श्री. पाटील यांना ‘दक्षिण’चा बदला घ्यायचा आहे; तर कागलमध्ये श्री. महाडिक यांनी श्री. मुश्रीफ यांच्या विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा महाडिकांवर राग आहे. 
खासदार महाडिक यांच्या विजयात मुश्रीफांचा मोलाचा वाटा होता. पण नंतर महाडिकांनी मुश्रीफांना राजकीय ठेंगा दाखवत त्यांचे नेतृत्व मान्य केले नाही. हाही राग मुश्रीफ यांना आहे. दुसरीकडे ज्यांना हे दोघे खासदार करणार म्हणतात, त्या प्रा. मंडलिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत कधीही सुतोवाच केलेले नाही, याबाबतचे संकेतही त्यांनी दिलेले नाहीत. उलट शिवसेनेकडूच आपण लढणार हे त्यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. 

प्रा. मंडलिक हे कुठल्याही पक्षाचे उमेदवार असले तरी हे दोघे त्यांना पाठिंबा देणार का? शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होणार का? असे प्रश्‍न उपस्थित होतात. डिसेंबर २०१८ मध्ये चार राज्यांतील विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुकीची शक्‍यता आहे. 

तसे झाले तर निवडणुकीला केवळ सात-आठ महिन्यांचा कालावधी उरतो. तरीही राष्ट्रवादीत उमेदवारीबाबत स्पष्टता नाही. काँग्रेसमध्ये पी. एन. पाटील जिल्हाध्यक्ष आहेत. पण सतेज पाटील हेच पक्षाचे नेतृत्व करत आहेत. पक्षाचा एकही आमदार नाही, खासदार नाही, अपवाद वगळता कोठेही सत्ता नाही. अशा परिस्थितीत सत्ता बदलण्याची ते भाषा करत आहेत. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जिल्ह्यात प्रचंड पडझड झाली आहे. एकेकाळी जिल्ह्यात बालेकिल्ला असणाऱ्या या पक्षांची ताकद गेल्या काही वर्षांत क्षीण झाली. 

विद्यमान खासदार नको, स्वतःची लोकसभा लढवण्याची इच्छा नाही. त्यातून ओढून ताणून दुसऱ्याला उमेदवारी देऊन पुन्हा २००९ चा खेळ मांडला जात आहे. गमतीचा भाग असा २००९ ला तो मंडलिकांसाठी मांडला, आता तो महाडिकांसाठी मांडला जातोय आणि त्यासाठी पुन्हा मंडलिकांच्या वारसांनाच पुढे केले जात आहे. त्यातून २००९ ला पक्षाला पराभव सहन करावा लागला. आताही या घडामोडी करत असताना पक्षाचा म्हणून विचार झाला असे वाटत नाही. 

राष्ट्रवादी कोल्हापूरवरील हक्क सोडणार का?
खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात हातकणंगलेत कोणी लढायला तयार नाही, हे चाचपणी केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यातून दोन्ही काँग्रेसला ही जागा सोडून देण्याची वेळ आली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हेच श्री. शेट्टी यांच्याविरोधात लढू शकतात. त्यातून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली, पण ही घडामोडही पुढे गेली नाही. हाच कित्ता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात गिरवला जात आहे. प्रा. मंडलिक हे शिवसेनेचेच उमेदवार राहिले तर राष्ट्रवादी कोल्हापूरवरील हक्क सोडणार का? त्यातून राष्ट्रवादीला काय मिळणार? हा प्रश्‍न आहेच. 

व्यक्तिगत राजकारणासाठीच...
राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही; पण पुढचा खासदार मीच असणार, असे ते सांगतात. श्री. मुश्रीफांना मी नको असेन, तर बघू, अशी त्यांची भूमिका आहे. पक्षाच्या पातळीवर स्पष्टता तर नाहीच. उलट पक्षश्रेष्ठींनीही श्री. महाडिक यांच्या विरोधात कधी भाष्य केलेले नाही. आपल्याला जे वातावरण हवे, ते तयार करायचे हे सतेज-मुश्रीफ यांचे वैशिष्ट्य आहे; पण त्याला पक्षश्रेष्ठींची मान्यता मिळेल असे नाही. व्यक्तिगत राजकारणासाठी हा खटाटोप सुरू असताना पक्षीय पातळीवरील धोरणे स्थानिक पातळीवर जाहीर करून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: Kolhapur News political special story