शेट्टींची भाजपला दिल्लीत सोडचिठ्ठी, जिल्ह्यात प्रेमपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - माजी खासदार कै. बाळासाहेब माने गटाची पुनर्बांधणी करण्याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी खासदार निवेदिता माने यांच्याऐवजी आपण उतरणार आहोत. २०१९ ला लोकसभेची निवडणूक आहे. त्यावेळच्या परिस्थितीवर पक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची भूमिका म्हणजे ‘दिल्लीत सोडचिठ्ठी आणि जिल्ह्यात प्रेमपत्र’ असा प्रकार असल्याचेही त्यांनी शेट्टींबद्दल बोलताना सांगितले.

कोल्हापूर - माजी खासदार कै. बाळासाहेब माने गटाची पुनर्बांधणी करण्याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी खासदार निवेदिता माने यांच्याऐवजी आपण उतरणार आहोत. २०१९ ला लोकसभेची निवडणूक आहे. त्यावेळच्या परिस्थितीवर पक्षाबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांची भूमिका म्हणजे ‘दिल्लीत सोडचिठ्ठी आणि जिल्ह्यात प्रेमपत्र’ असा प्रकार असल्याचेही त्यांनी शेट्टींबद्दल बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी भाजपसोबत आघाडी केली. सध्या त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. माने यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

ते म्हणाले, ‘‘राजकारणात लढाई थांबली की गट थांबतो. गट थांबला की कार्यकर्ताही थांबतो. त्यामुळे राजकारणात शांत राहून चालत नाही. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत कै. माने यांनी पाचवेळा निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. त्यानंतर श्रीमती निवेदिता माने यांनी पाचवेळा निवडणूक लढविली. त्यामध्ये दोनवेळा त्या विजयी झाल्या. गेल्यावेळी मात्र त्यात खंड पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला दिली. त्यावेळी आम्हाला आश्‍वासन देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थांबण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आम्ही थांबलो; पण आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. पाच वर्षे थांबल्यामुळे माने गटाचे कार्यकर्ते सर्व पक्षांत विखुरले आहेत. त्या सर्वांना एकत्र करत, शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन माने गटाची बांधणी करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकांना अद्याप एक वर्ष आहे. त्यामुळे तयारीला आपणास वेळ मिळणार आहे. उद्यापासून मतदारसंघातील गावांचा दौरा सुरू करणार आहे. वर्षभरात सर्व गावांचा दौरा पूर्ण करणार आहे.’’

भाजप प्रवेशाबाबत बोलताना श्री. माने म्हणाले, ‘‘माजी खासदार श्रीमती माने या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. मी पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे; पण सक्रिय कार्यकर्ता नाही.  कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे अद्याप ठरविलेले नाही. त्याला अजून एक वर्ष अवधी आहे. त्यावेळची परिस्थिती पाहून आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या आमचा लढा अस्तित्वासाठी आहे. कोणत्याही पक्षाला आव्हान देण्याचा किंवा कमी लेखण्यासाठी आपला लढा नाही. आजपर्यंत संघर्षाशिवाय माने गटाला काहीच मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका घेऊन माने गटाच्या विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा मानस आहे.’’

खासदार शेट्टी यांच्या राजकारणाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘आजपर्यंत त्यांचे राजकारण तडजोडीचेच राहिले आहे. त्यांच्या राजकारणाचा अनुभव मंत्री सदाभाऊ खोत यांना अधिक आल्यानेच सध्या ते संघटनेतून बाहेर आहेत. भाजपवर आरोप करायचे. सरकारमधून बाहेर पडल्याच्या घोषणा करायच्या आणि जिल्हा परिषदेत मात्र त्यांच्यासोबतच राहायचे. त्यांचा हा प्रकार म्हणजे ‘दिल्लीत सोडचिठ्ठी आणि जिल्हा परिषदेत प्रेमपत्र’ असा आहे.’’

आपल्या मातोश्री निवेदिता माने यांनी आता लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण यापुढे काम करणार अाहे.
- धैर्यशील माने

Web Title: kolhapur news politics Dhairyashil Mane