यंत्रमाग कामगारांचे आंदोलन स्थगित - मिश्रीलाल जाजू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

इचलकरंजी - मजुरीवाढीच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन आज दहाव्या दिवशी स्थगित केले. थोरात चौकात झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात याची घोषणा कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी केली.

इचलकरंजी - मजुरीवाढीच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन आज दहाव्या दिवशी स्थगित केले. थोरात चौकात झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात याची घोषणा कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी केली. सहा पैसे मजुरीवाढीबाबत प्रशासनाने आश्‍वासन न पाळल्यास 20 जानेवारीला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही जाजू यांनी दिला. 

2013 करारानुसार मजुरीवाढ करण्याच्या मागणीसाठी 1 जानेवारीपासून यंत्रमाग कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. अप्पर कामगार आयुक्तांच्या मान्यतेने सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी 3 पैसे मजुरीवाढ जाहीर केली होती. मात्र ती अमान्य करीत कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. काल प्रांत कार्यालयात बैठक झाली होती. तीन ऐवजी सहा पैसे वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्याला येत्या पाच दिवसांत मंजुरी दिली जाणार असल्याची हमी दिली.

या पार्श्‍वभूमीवर आज थोरात चौकात झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात मिश्रीलाल जाजू यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये कामगारांनी संघटीतपणे दिलेल्या लढ्याला यश आले असल्याचे सांगितले. सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे सहा पैसे मजुरीवाढ जाहीर न केल्यास पून्हा 20 जानेवारीरोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचे त्यांनी जाहीर केले. 

दत्ता माने, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, मदन मुरगूडे, राजेंद्र निकम, परशराम आगम, मारुती आजगेकर, धोंडीबा कुंभार, शिवानंद पाटील, शिवाजी भोसले, बंडोपंत सातपूते यांची भाषणे झाली. 

नवीन प्रस्तावाला विरोध शक्‍य 
सहाय्यक कामगार आयुक्तांनी तीन पैसे मजुरीवाढीला यंत्रमागधारकांनी आक्षेप नोंदविला नव्हता; मात्र प्रथम खर्चिवाले यंत्रमागधारकांची मजुरीवाढ केल्यानंतर कामगारांच्या मजुरीवाढीचा निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र आता सहा पैसे मजुरीवाढीच्या प्रस्तावाला यंत्रमागधारकांकडून विरोधाची शक्‍यता आहे. 
 

Web Title: Kolhapur News Power loom worker agitation