व्यक्तिद्वेषाच्या राजकारणातून काँग्रेसची वाताहत - प्रकाश आवाडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

इचलकरंजी - ‘‘एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण जिल्हा पातळीवर पक्षात व्यक्तिद्वेषाचे राजकारण सुरू झाले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे’’, अशी खंत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.

इचलकरंजी - ‘‘एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण जिल्हा पातळीवर पक्षात व्यक्तिद्वेषाचे राजकारण सुरू झाले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे’’, अशी खंत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.

पक्षाच्या या दुरवस्थेबद्दल त्यांनी केंद्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून व्यथा मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमानिमित्त श्री. आवाडे आज शहर काँग्रेस कमिटीमध्ये आले. यावेळी त्यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तब्बल आठ महिन्यांनंतर ते काँग्रेस कमिटीत आल्यामुळे ते काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. त्यांनी जिल्हा काँग्रेसच्या भूमिकेवर हल्लाबोल केला.

मी राजकीय संन्यास घेतलेला नाही, असा पुनरुच्चार करत श्री. आवाडे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील काँग्रेसच्या दुरवस्थेला पक्षातील नेतेच जबाबदार आहेत. पक्षांची बांधणी मजबूत करण्याऐवजी जिल्हा काँग्रेसकडून व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले जाते. त्यामुळे व्यक्तिद्वेषाचे राजकारण संपत नाही, तोपर्यंत पक्षापासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये कोणीतरी सांगावे आणि आम्ही त्यांच्या मागे फरफटत जावे, हे होणार नाही.’’

आपण काँग्रेसमधील व्यक्तिद्वेषाच्या राजकारणावर नाराज आहे. पण काँग्रेस सोडलेली नाही, असे स्पष्ट करत श्री. आवाडे यांनी काँग्रेसने इचलकरंजी व जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय मोठे करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. 

ते म्हणाले, ‘आजही काँग्रेस भक्कम व्हावी, ही भूमिका आहे. पक्षात व्यक्तिद्वेष जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे. जिल्हा काँग्रेसमधून कुरघोड्यांचे राजकारण थांबवावे व पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. आवाडे यांनी केले.

या वेळी नगरसेवक शशांक बावचकर, शहराध्यक्ष प्रकाश मोरे, शामराव कुलकर्णी, विलास गाताडे, अशोक सौंदत्तीकर, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, राहुल खंजीरे आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Prakash Awade comment