जीवघेणी मस्ती हवीच कशाला?

जीवघेणी मस्ती हवीच कशाला?

प्रसंग - १
‘‘पहा, आम्ही कशी मजा करतोय... तुम्ही हे क्षण मिस करताय...’’ हे होडीतून पाण्याच्या मध्यभागी गेलेले आठ तरुण आपल्या मित्रांना फेसबुकवरून लाईव्ह सांगत होते. बोलत असतानाचे त्यांचे आनंदलेले चेहरे... बोलतानाचा उत्साह अगदी फसफसून वाहत होता. हे सर्व तरुण नागपूर जिल्ह्यातील वेणा तलावात वर्षा पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यानंतर काही वेळेतच ही बोट पाण्यात बुडाली आणि काही वेळापूर्वी मित्रांसोबत बोललेल्या आठही जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. 

प्रसंग - २
पाऊस पडतोय...समुद्र उधाणाला आलाय...लाटांचे तांडव सुरू आहे...किनाऱ्यावरून आदळून उधळणाऱ्या लाटांत भिजण्याचा मोह होणार नाही तर नवलच. मुंबईत हाच मोह एका तरुणाला भोवला. लाटेच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन भिजण्याच्या नादात पाय निसटला आणि त्यानंतर त्या तरुणाचे कलेवरच बाहेर काढण्याची वेळ आली...हातातोंडाशी आलेला एक कर्ता तरुण थोड्याशा निष्काळजीपणाने मरण पावला.

वर उदाहरणादाखल दिलेल्या व अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे आपण पाहतो; मात्र त्यातून काही शिकण्याची भावना काही होताना दिसत नाही. वारंवार असे प्रसंग घडताना दिसत आहेत. पावसामुळे खुललेला निसर्ग खुणावतो आणि त्याला साद घालण्यासाठी तरुणाई बाहेर पडते. प्रचंड ऊर्जेने फसफसलेली तरुणाई सहसा ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. मौजमजेच्या नादामध्ये निसरड्या वाटेवर कधी पाय घसरतो तेच समजत नाही आणि अनवस्था प्रसंग ओढवतो. यामध्ये काहीजण कायमचे जायबंदी झालेले दिसतात, काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. मौजमजा ठीक आहे; पण त्यापायी जीव पणाला लावणे कितपत योग्य आहे? आपल्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण कुटुंबालाही बसते, हे कधी कळणार! आनंद लुटण्याचे वय आहेच, तो लुटलाही पाहिजे; पण त्याच वेळी तो आनंद लुटणे जिवावर बेतणार नाही, हा विवेक आपल्यात कधी येणार? फेसबुकच्या वॉलवर आम्ही कसे एंजॉय केले, हे दाखवण्याच्या नादात आपण लाखमोलाचा जीव पणाला लावतोय याचे भान कधी येणार? हे प्रश्‍न तरुणाईने स्वतःला आता विचारण्याची जरूर वेळ आली आहे. तारुण्याची मस्ती...ठासून भरलेली ऊर्जा...अनावश्‍यक खर्ची पडते आहे का, याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे.

ही मस्ती...ही ऊर्जा चांगल्या कामामध्ये वापरली जाणे आवश्‍यक आहे. अनेक तरुणांचे ग्रुप एकत्र येतात आणि आपल्यातील ही ऊर्जा सत्कारणी लावताना दिसतातही. पर्यटनस्थळांवर पडलेल्या दारूच्या बाटल्या, काचांचे खच, कचरा जमा करून निसर्गातील स्वच्छता करताना दिसतात. त्यांनी तारुण्याचे मर्म नक्कीच जाणले आहे. चमकायचे आहे ना; तर मग कार्यमग्न राहून चमकण्याचा आनंद का लुटू नये. सेवेचा आनंद घेत, ही ऊर्जा का खर्ची टाकली जाऊ नये याचाही विचार आता खरेच करण्याची वेळ आली आहे. तारुण्याची मस्ती लुटताना ती जीवघेणीच ठरायला हवी का? हे स्वतःला विचारायलाच हवे. मस्ती करून जीव धोक्‍यात टाकणाऱ्यांचे फालोअर होण्यापेक्षा... समाजभान जपत निसर्ग, समाज जपणाऱ्यांचे अनुयायी होण्यासाठी आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे!

‘पाऊस निघूनि गेला, ओल्या आठवांना आणखी भिजवूनि गेला...’असा ओल्या आठवणींना भिजवणारा पाऊस, हिरव्यागार धरतीवर खळाळणारे झरे, तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या, गर्द झाडीने नटलेले डोंगर, दऱ्यांतून अलवार फिरणारे धुके सर्वांनाच मोहित करते. उंचच उंच सुळके, गड-किल्ले, धबधबे पर्यटकांना खुणावतात; मात्र आपले पर्यटन सुरक्षित होण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. अनेकदा धोकादायक पर्यटनस्थळांवर तरुणांचा अतिउत्साह नडतो. मोबाईलवरील सेल्फी काढण्याला आलेले अवास्तव महत्त्व, समुद्रकिनाऱ्यांवर लिहिलेल्या सूचना न पाळणे, सुरक्षा रक्षकांना न जुमानणे, मद्यधुंद अवस्थेत गाड्या वेगाने पळविणे, यांमुळे होणारे अपघात ही बेजबाबदार पर्यटनाची फलप्राप्ती आहे. घाटांतील रस्त्यांची योग्य पद्धतीने न घेतलेली काळजी, पर्यटनस्थळी होणाऱ्या पर्यटकांच्या लुटीच्या घटना यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा योग्य बंदोबस्त, इतरांच्या तसेच, स्व-सुरक्षिततेची स्वतःची जबाबदारी या बाबी सुरक्षित पर्यटनासाठी आवश्‍यक आहेत.
- वेदा सांगरूळकर

पावसाळ्यात दिवस आणि रात्री होणारे ट्रेक तरुणाईला आकर्षित करतात. अशा ठिकाणी दिलेल्या सूचनांनुसार काठी, टॉर्च बाळगणे आवश्‍यक असते. आम्ही मित्र-मैत्रिणी ट्रेकला गेलो होतो. जवळच दोन मोठे डोंगर आणि त्यांच्या बाजूलाच पाण्यानं भरलेलं धरण..! ते सौंदर्य पाहत-पाहत निघालो. आम्ही कुठेही कचरा न होण्याची काळजी घेत होतो; पण आजूबाजूला पडलेल्या पाण्याच्या, दारूच्या बाटल्या बेजबाबदार पर्यटनाचा पुरावा देत होत्या. निसरडा रस्ता, पुढे उंच सुळका त्यावरून दिसणारी नयनरम्य; परंतु अतिउत्साही आणि मद्यपींसाठी थोड्याशा हलगर्जीपणामुळे जिवावर बेतू शकेल अशी दरी...!! त्यामुळे पर्यटन काळजीपूर्वकच करायला हवे.
- स्वराली गद्रे

पावसाळ्यातील पर्यटन ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पर्वणी असते. अतिउत्साहाच्या भरात पर्यटनस्थळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्वप्रतिमेच्या मोहात पडून कुठे कड्याच्या टोकावर चढून सेल्फी घे, खोल पाण्यात जा आणि घ्या सेल्फी... असे प्रकार वाढत आहेत. क्षणिक आनंदासाठी जीव धोक्‍यात घालून काय मिळतं? असले उपद्‌व्याप करताना ‘माझे बरे-वाईट झाले तर आई-वडील, पत्नी-मुलांचे काय होईल? आपल्याशिवाय त्यांचे जीवन कसे असेल?’ हा विचार करावा. खळाळणारे पाणी, नयनरम्य निसर्ग डोळ्यांत साठविणे जास्त आल्हाददायक आहे. हौसेपायी जीव गमावणाऱ्या तरुणाईने सेल्फीचं खूळ आवरलं पाहिजे. 
- शुभांगी खोत

हल्ली अतिउत्साही पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे पर्यटनस्थळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सेल्फी काढून व्हॉटस्‌ॲप, फेसबुकला अपडेट करणे, त्यावरचे इतरांचे कमेंट, लाइक्‍स यांची तरुणाईला चटक लागली आहे. त्यामुळे सावधानतेच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. समुद्रकिनाऱ्यांवर धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरण्यास मज्जाव करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची खिल्ली उडवली जाते. त्यांचा डोळा चुकवून पोहता येत नसणारेही अनेकजण पाण्यात उतरतात. जिवाला मुकल्यानंतर हळहळ वाटून उपयोग होत नाही. सुरक्षा रक्षकांनाही सेवा बजावताना मर्यादा येतात, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे एखाद्याला विनाकारण नोकरीला मुकावे लागू शकते, याचाही तरुणांनी विचार करावा.
- युक्ता निकम

पावसाळा म्हणजे निसर्गाची देणगी. पावसाळ्यात बहरणारे निसर्गसौंदर्य म्हणजे पावसाची कलाकृती. याचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला निघणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एका बाजूला पर्यटन व्यवसाय वाढत आहे. पर्यटकांचा निष्काळजीपणा तसेच, पर्यटनस्थळावर नसलेली सुरक्षाव्यवस्था हे धोकेही आहेत. पर्यटनस्थळी अपघात घडल्यानंतर सावधानतेचा इशारा देणारे फलक लागतात. तरीदेखील पर्यटक अतिउत्साहात त्याच त्याच चुका करताना दिसतात. निर्जन रस्त्यावर पर्यटकांची लूटमार, बलात्काराच्या घटनांच्या बातम्याही वाचायला, ऐकायला मिळतात. पर्यटनस्थळावरील सुरक्षा ही पर्यटक, प्रशासन अशा दोहोंचीही जबाबदारी आहे. 
- विशाखा भंडे

पावसाळ्यात बहरणारे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी निसर्गाच्या प्रेमात पडणे आणि पर्यटनासाठी जाणे सर्वांनाच रोमांचित करते. पर्यटनाचा आनंद लुटताना सुरक्षेची काळजी घेणे तेवढेच आवश्‍यक ठरते. पर्यटनाला निघण्यापूर्वी ज्या ठिकाणी जायचं आहे, तेथील पूर्ण माहिती करून घ्यावी. कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था, परिसराबाबत इतरांना आलेले बरे-वाईट अनुभव यांबाबत चौकशी करावी. आवश्‍यक औषधे, प्रथमोपचार साहित्य, कोरडे अन्नपदार्थ सोबत घ्यावे. वेळेचे बंधन पाळावे. इतर पर्यटकांच्या सुरक्षेचे भान असणे आवश्‍यक आहे. काही मद्यधुंद हुल्लडबाजांचा धुडगूस घालणे म्हणजे पर्यटन असा समज असतो. त्यामुळे निसर्गाची विटंबना होते. यांना चाप बसविणे, कायदेशीर कारवाई करणे आवश्‍यक आहे. पोलिस, प्रशासनाने यासाठी कडक पावले उचलावीत.
- विक्रांत नेमाडे

पावसाळ्याची जास्त उत्सुकता असते ती ‘टिन एजर्स’मध्ये. शहराजवळील सौंदर्यस्थळे बघण्यासाठी लोकांची जणू काही जत्राच भरते. लोकांना निसर्ग पाहण्यापेक्षा त्याला स्टेटसवर अपडेट करण्यात जास्त आंनद वाटत असतो; पण कधी कधी लोकांना फोटो काढण्याच्या नादात आजूबाजूच्या धोकादायक स्थितीचा विसर पडतो. नदीचे पाणी कमी आहे म्हणून थेट नदीच्या मध्यभागी जाऊन फोटो काढतात किंवा मौज-मजा करतात. त्यांचे वाढत चाललेल्या पाण्याकडे लक्ष राहत नाही. हकनाक जीव गमावतात. सेल्फी काढताना स्वतःकडे पाहू शकतो, तर आपल्यामागून येणारे संकट का बरे दिसत नाही? नंतर या लोकांना अपंगत्व आल्यास सेल्फीने स्टिकनंतर वॉकिंग स्टिक द्यायला लागते.
-सम्राट मुंडे

उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यासाठी विविध विशेष ट्रेक्‍स आयोजित केले जातात. त्या-त्या वेळी टीम लीडरने काठी, टॉर्च, प्रथमोपचार पेटी, दोरी, योग्य प्रकारची पादत्राणे, आवश्‍यक औषधे, खाद्यपदार्थांबाबत दिलेल्या सूचना पाळणे आवश्‍यक असते. अनेक टीम लीडर्स कटाक्षाने याची अंमलबजावणी करवून घेतात. धोकादायक स्थितीतील दरडी कोसळण्यापासूनही सावध राहावे लागते; परंतु जेव्हा बेजबाबदार व्यक्तींकडून अशा ठिकाणी हुल्लडबाजी होते, तेव्हा अपघात घडतात. वारंवार अशा गोष्टी एखाद्या पर्यटनस्थळी घडून येतात, तेव्हा चांगली ठिकाणेही पर्यटनासाठी बंद केली जातात. पर्यटनस्थळी वाहतूक, अन्नपदार्थ, हॉटेलिंगच्या अवाच्या सव्वा दरांमुळे होणारी पर्यटकांची फसवणूक पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली खपवली जाते. याकडे प्रशासनाचेही सोईस्कर दुर्लक्ष असते. यामुळेही पर्यटन असुरक्षित बनते. सर्वांनीच सुरक्षित पर्यटनासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.
-अमेय कुलकर्णी

निसर्गभ्रमण आणि साहसी क्रीडाप्रकार हे चैतन्यदायी मनोरंजनासाठी, व्यक्तित्वविकासासाठी आजच्या कृत्रिम शहरी राहणीत विशेष गरजेचे आहेत. अशा उपक्रमांवर प्रतिबंध न घालता, अधिक प्रशिक्षण, सुरक्षात्मक उपायांची योजना करणं गरजेचं आहे. प्रथमोपचार तंत्र अवगत असलं, तर अपघात होऊनही जिवाला धोका कमी संभवतो. आज तंत्रज्ञानामुळे अर्धवट माहिती सहज उपलब्ध आहे. जाणकारांबद्दलचा अनादर आणि शिस्तीचा अभाव आज आढळतो. पर्यटन आणि मद्यपान यांची एक अभद्र युतीही अलीकडे फारच बोकाळली आहे, जी अपघाताला कारणीभूत ठरते. आपलेच छायाचित्र क्षणार्धात आपणच काढायचे नवे तंत्र स्मार्टफोनमुळे युवक-युवती आणि सुशिक्षितांनी आत्मसात केले. पण, सेल्फी कुठे काढावी आणि कुठे काढू नये, याचे भान मात्र सेल्फीचे वेड लागलेल्यांना राहिलेले नसल्यानेच, सेल्फी काढताना अनेकांचे बळी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
-यश केखलेकर
(प्रतिक्रिया संकलन - अमृता जोशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com