प्रतापसिंह चव्हाण देणार राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - कर्मचारी संघटनांपासून ते काही संचालकांच्या तक्रारीमुळे गाजलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण राजीनामा देणार आहेत. सांगली जिल्हा बॅंकेत आजच त्यांना या पदावर घेण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. 

कोल्हापूर - कर्मचारी संघटनांपासून ते काही संचालकांच्या तक्रारीमुळे गाजलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण राजीनामा देणार आहेत. सांगली जिल्हा बॅंकेत आजच त्यांना या पदावर घेण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. 

कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर १३ नोव्हेंबर २००९ ला प्रशासक नियुक्तीची कारवाई झाली. त्यानंतर काही दिवस विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, त्यानंतर उत्तम इंदलकर यांनी प्रशासक म्हणून काम केले. २० एप्रिल २०१२ ला श्री. चव्हाण यांनी बॅंकेच्या प्रशासकपदाचा कार्यभार घेतला. तत्पूर्वी, ते नांदेड जिल्हा बॅंकेचे प्रशासक होते. राज्य बॅंकेत उपसरव्यवस्थापक पदावर कार्यरत असताना त्यांच्या या नियुक्‍त्या झाल्या. 

कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर २१ मे २०१५ ला संचालक मंडळ निवडून आल्यानंतर श्री. चव्हाण यांची प्रशासक म्हणून कारकीर्द संपुष्टात आली. पण, तीन वर्षांत त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याबरोबरच बॅंकेच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले. कर्मचारी विरोधातील काही निर्णयामुळे ते संघटनेच्या रडावर होते. त्यांना हटविण्यासाठी कर्मचारी संघटनेने मोर्चा, ठिय्या यांसारखी आंदोलने केली. राज्य बॅंकेतून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली.

कर्मचाऱ्यांबरोबरच संचालकांशीही त्यांचे मतभेद झाले होते. त्यातून संचालकांनीही त्यांच्याविरोधात उठाव सुरू केला होता. पण, अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ हे त्यांच्यामागे ठाम राहिले.

आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकांच्या बैठकीत श्री. चव्हाण यांना मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर घेण्याचा ठराव करण्यात आला. गेली दोन वर्षे या बॅंकेचे श्री. चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते. सांगली बॅंकेच्या निर्णयामुळे ते राजीनामा देणार आहेत. आज (ता. १) याबाबतची स्पष्टता होईल.

Web Title: Kolhapur News Pratapshingh Chavan will resign