पूरस्थितीत गर्भवती, कुपोषितांकडे विशेष लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

जिल्हा आरोग्य अधिकारी - आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्ण; २४ तास कक्ष 

जिल्हा आरोग्य अधिकारी - आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्ण; २४ तास कक्ष 

कोल्हापूर - पूरस्थितीत पूरग्रस्त गावातील गरोदर माता, तीव्र व मध्यम कुपोषित बालके यांच्याकडे, तसेच अतिगंभीर रुग्ण, अपंग, दीर्घकाळ अंथरुणात असलेल्या रुग्णांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्हा परिषदेत कक्ष स्थापन केला असून, तो २४ तास सुरू राहणार आहे. त्याकरिता २५ कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १२९ पूरग्रस्त व २१० जोखीमग्रस्त गावांत जोखीम गट तयार केला आहे. त्यासाठी गावात जाऊन गरोदर माता, बाळंतपणाची अपेक्षित तारीख, अतिगंभीर रुग्णांची माहिती घेतली आहे. त्यांची जून ते सप्टेंबर या कालावधीत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. जोखीम बालकांची संख्या ६२ असून, अतिगंभीर किंवा अंथरुणावर असणाऱ्या रुग्णांची संख्या ३६४ आढळून आली. मुख्यालयाप्रमाणेच तालुक्‍याच्या ठिकाणीही तालुका आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा कर्मचाऱ्यांसह कक्ष स्थापन केले आहेत. संभाव्य पूरग्रस्त गावांसाठी ५९ वैद्यकीय अधिकारी, ६४ आरोग्य सहायक, ८५ आरोग्यसेवक, १०३ आरोग्यसेविका असे ३११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. त्या सर्वांना मुख्यालय न सोडण्याचे आदेशही दिले आहेत. 

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये आवश्‍यक औषधसाठा दिला आहे. साथरोग नियंत्रण किटही अद्ययावत केले आहे. संपर्क तुटणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांसाठी अतिरिक्‍त दोन ठिकाणी जादा औषधसाठा ठेवला आहे. पूरग्रस्त व संपर्क तुटणाऱ्या गावांना आरोग्यसेवक, सहायक व वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दैनंदिन भेट देऊन जागेवरच उपचार करण्यात येणार आहेत. पाणी शुद्धीकरणाची नियमित माहिती घेण्यात येणार आहे. 
हिवताप अधिकाऱ्यांकडील फवारणी पथक आवश्‍यकतेनुसार देण्यात येईल. प्रत्येक वैद्यकीय पथकाकडे पुरेसा औषधसाठा व ब्लिचिंग पावडर असल्याची खात्री करण्यात येईल. आरोग्य केंद्रातर्फे वाहन यंत्रणा व अन्य साधनसामुग्री तयार ठेवली आहे. याशिवाय शेजारील सांगली, बेळगाव जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेचीही मदत घेण्यात येणार आहे. या वेळी अतिरिक्‍त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. व्ही. डी. नांद्रेकर उपस्थित होते.

धोकादायक घरांपासून सावधान
महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक घरे आणि इमारतींची माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. 

बांधकाम विभागाचाही स्वतंत्र कक्ष
बांधकाम विभागानेही आपत्कालीन आराखडा तयार केला असून, स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी एम. डी. मोहिते, राजेश ठाकूर, एस. के. जाधव व महेश मोहिते यांची नियुक्‍ती केली आहे. तालुक्‍याची जबाबदारी तेथील उपअभियंत्यांवर सोपवली आहे. रस्त्यावर झाड पडणे, दरड कोसळणे, रस्त्यावरील खड्डे अशा ठिकाणी कार्यवाहीसाठी डंपर, ट्रक, ट्रॅक्‍टर, जेसीबी तयार ठेवले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांनी दिली.

तालुकानिहाय पूरबाधित गावे
राधानगरी ११, करवीर २३, पन्हाळा १२, गगनबावडा ७, कागल ११, शिरोळ ३८, भुदरगड ३, शाहूवाडी ५ आणि हातकणंगले तालुक्‍यातील २० गावे पूरबाधित होतात.

Web Title: kolhapur news pregnent women malnutrician watch in flood condition