खासगी सावकारीतून ३३ लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - खासगी सावकारीसह ३३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. योगेश वसंतराव पाटील (रा. मंगळवार पेठ), प्रवीण ईश्‍वर मोहिते (रा. देवणे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) आणि महेश संभाजीराव पाटील (रा. संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. 

कोल्हापूर - खासगी सावकारीसह ३३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. योगेश वसंतराव पाटील (रा. मंगळवार पेठ), प्रवीण ईश्‍वर मोहिते (रा. देवणे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) आणि महेश संभाजीराव पाटील (रा. संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी प्राची साखळकर (रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती धीरज साखळकर बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी देवकर पाणंद येथील जमीन विकसित करण्यासाठी घेतली आहे. कामाच्या माध्यमातून त्यांची प्रवीण मोहितेशी ओळख झाली. त्याला सुरू असलेल्या बांधकामात फ्लॅट खरेदी करायचा होता. फ्लॅटचा व्यवहार ३२ लाख ५० हजार रुपये ठरला; पण तेवढ्या रकमेचे कर्ज बॅंक देत नसल्याने मोहितेने मित्र महेश पाटील याच्या पत्नीच्या नावाने कर्ज घेण्याचे ठरवले. तिच्याच नावाने संचकारपत्र केले. त्या बदल्यात पाटील यांच्या पत्नीला फायनान्स कंपनीने २५ लाखांचे कर्ज मंजूर केले. ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फायनान्स कंपनीने मंजूर कर्जापैकी १८ लाखांचा धनादेश दिला.

हा धनादेश धीरज साखळकर यांच्या बॅंक खात्यावर मोहिते याने भरला. त्याच बॅंकेत तो पिग्मी एजंट म्हणून काम करतो. ती रक्कम साखळकर यांच्याकडून यापूर्वी घेतलेल्या कोऱ्या धनादेशाद्वारे प्रवीण मोहिते व महेश पाटील यांनी परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. ही रक्कम आपल्याला न मिळाल्याबद्दल आणि जमा आणि नावे झाल्याबद्दलचा मोबाईलवर मेसेजही न आल्याबद्दल साखळकर यांनी बॅंकेत तक्रार केली. 

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक साखळकर आर्थिक अडचणीत होते. त्यांची प्रवीण मोहितेने योगेश पाटीलशी ओळख करून दिली. त्यांच्याकडून साखळकर यांनी २५ लाखांचे कर्ज पाच टक्के व्याजदराने घेतले. त्याबद्दल्यात त्यांनी दोन फ्लॅटही त्याला तारण दिले. घेतलेल्या कर्जापैकी १५ लाख ६० हजारांची रक्कम त्यांनी परतफेड केली. तरीही योगेश त्यांच्याकडे ३७ लाख ५० हजारांची मागणी करू लागला. त्यासाठी त्याने साखळकर कुटुंबाला शिवीगाळ, धमकावण्याचा प्रकार केला. हा प्रकार १ मार्च २०१६ ते २० जुलै २०१७ या मुदतीत घडला. आपली ३३ लाख ६० हजारांची फसवणूक झाल्याचे साखळकर यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Kolhapur News Private Bankers Fraud