राज्यातील एसटी कॅन्टीन दुरवस्थेत

शिवाजी यादव
रविवार, 24 जून 2018

मोजक्‍या टेबल-खुर्च्या, त्या शेजारीच भटारखाना, तिथल्या अन्नपदार्थांचा भपकारा सोसत, कुठंतरी एका खुर्चीत प्रवाशांनी बसायचं. अस्वच्छ हाताने दिलेले ग्लासभर पाणी प्यायचं... पुढे नाश्‍त्याची इच्छा चहावर भागवायची. जाताना महागडे बिल देत निमूटपणे बसमध्ये बसायचं... अशी अवस्था राज्यातील एसटीच्या कॅन्टीन व खानपान सेवेची आहे. १८ टक्के प्रवासी भाडेवाढ देऊन ‘पोट व खिसा’ बिघडवणारी सेवा घ्यावी लागते. या गलथान कारभाराची वेध घेणारी मालिका....

कोल्हापूर - एसटी महामंडळ निविदा काढून एसटी बस स्थानकावरील कॅन्टीन सेवा चालविण्यासाठी देते. मात्र, एसटीच्या काही ठरावीक अधिकाऱ्यांनी ‘लाख’मोलाचा लाभ उठवत कॅन्टीनच्या गलिच्छ सेवेकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे राज्यातील ४२ हून अधिक एसटी कॅन्टीनचा ठेका दहा वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच मालकांकडे आहे. यातूनच लाभाची बाब उघड होते. तर दीडशेहून अधिक कॅन्टीनची सेवा अडगळीत व गलिच्छ असल्याने प्रवाशांना पैसे देऊन पोट बिघडवून घेण्याची वेळ आली आहे.

एस.टी.च्या जागेत चांगले पदार्थ माफक दरात द्यावेत, स्वच्छ वातावरणात बस स्थानकात मिळावेत, असा नियम आहे. त्यानुसार मुख्य प्रशासनाच्या परवानगीने विभाग नियंत्रक कॅन्टीन चालवण्याची निविदा काढतात. त्यानंतर ठेका मिळाला की, खासगी मालकाची बस स्थानक किंवा पिकअप शेडमध्ये कॅन्टीन सेवा सुरू होते. त्याची ११ महिन्यांची मुदत असते. याकाळात त्याने चांगली सेवा दिल्यास, ठेका पुढे एक-दोन वर्षे वाढतो. 

एस.टी.च्या विभागीय अधिकाऱ्यांनी कॅन्टीनला अचानक भेट देणे, तपासणी करणे, प्रवाशांकडून कॅन्टीन सेवेबाबत अभिप्राय घेणे, संबंधित कॅन्टीन सेवा चांगली आहे किंवा नाही? याचा अहवाल विभाग नियंत्रकांना पाठवावा लागतो. त्यानुसार राज्यातील काही अधिकारी कॅन्टीनला जातात. तिथल्या व्हिजीट बुकमध्ये नोंद करतात. चहा-नाश्‍ता करून जातात, तर काही जात नाहीत. 

कॅन्टीन चालकही ‘साहेबा’ला खूश करण्यासाठी पदार्थांच्या पार्सलसोबत ‘लाभदायक पाकीट’ घरपोच करतो. यातूनच खूश झालेले साहेब कॅन्टीनच्या सेवेवर ‘प्रभावी’ ताशेरे मारतातच, असे नाही. त्यामुळे राज्यभरात गेल्या वर्षभरात पाच ते सात अपवाद वगळता अन्यत्र कोठेही कॅन्टीन सेवा रद्द केल्याची कारवाई झालेली नाही. यातून एस.टी. कॅन्टीन गलथान कारभाराची केंद्रे बनली आहेत.  

राज्यातील एस.टी. कॅन्टीनमध्ये चहा तोच; पण कुठे पाच तर कुठे दहा रुपये. पोहे तेच, कुठे दहा, तर कुठे २० रुपये. वरणभात ४० ते ५० रुपये, तर जेवण ७० ते ८० रुपये असे दर आहेत. बहुतेक अन्नपदार्थ दर्जाहीन असतात. पाणी कितपत स्वच्छ असते, याची खात्री फारशी कोणी करत नाही. अशा स्थितीत कॅन्टीनची सेवा प्रवाशांच्या आरोग्याची सत्त्वपरीक्षा घेणारी आहे. 
- निखिल कुलकर्णी, प्रवासी  

अशी आहे सेवा -

  • राज्यात २५० बस स्थानके, ७१० पिकअप शेड  
  • यापैकी १८० बस स्थानकांवर कॅन्टीन सेवा 
  • सहा बस स्थानकांवर कॅन्टीन सेवाच नाही 
  • २०० हून अधिक पिअपक शेडमध्ये कॅन्टीन नाही  
  • चार कॅन्टीन मालकांकडे २५ वर्षे ठेका कायम
Web Title: Kolhapur News Problems in ST Canteen special