अंबाबाई मंदिर पुजारी हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दोन हजार पानांचे पुरावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे दोन हजार पानांचा विविध पुराव्यांचा संच बुधवारी सादर केला, त्यात तीनशे वर्षांपूर्वीपासूनच्या विविध सनदा, वटहुकूम, आज्ञापत्रे, पत्रव्यवहार, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या, इतिहास संशोधकांची विविध संशोधकीय मांडणी, पुजाऱ्यांनी दिलेले माफीनामे, न्यायालयीन निर्णय आदी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या छायांकित प्रती जोडल्या आहेत. समितीतर्फे आणखी काही पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले जाणार असून, त्याची पुढील सुनावणी 20 जुलैला होईल.

पंढरपूर, शिर्डी आदी देवस्थानांप्रमाणे श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून पगारी पुजारी नेमावेत, यासाठी आंदोलन तीव्र झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संघर्ष समितीकडून पुरावे घेऊन सरकारच्या विधी व न्याय विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आज पहिली सुनावणी झाली.

करवीरचे संभाजी महाराज यांच्या आज्ञेने 1715 मध्ये अंबाबाई मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या सिधोजी हिंदूराव घोरपडे यांनी अंबाबाईची प्रधानकी दिलेल्या सावगावकर (प्रधान) यांना दिलेली सनद, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांची मंदिरासंबंधी व पुजाऱ्यांसंबंधीची आज्ञापत्रे, डॉ. कुंदनकर, प्रसिद्ध इतिहास संशोधक ग. ह. खरे, कोल्हापूर गॅझेटियर डॉ. ग. स. देगलूरकर, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. इंदुमती पंडित अशा प्रकांड पंडितांची संशोधकीय मांडणी, अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या सीडी आदी पुरावेही आज सादर केले.

संघर्ष समितीचे संजय पवार, आर. के. पोवार, विजय देवणे, दिलीप देसाई, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

खडीसाखर - फुटाण्यांचाच प्रसाद
अंबाबाई मंदिरात प्रसाद म्हणून खडीसाखर व फुटाण्यांचाच प्रसाद दिला जातो. मात्र, काही वर्षांत जाणीवपूर्वक अंबाबाई विष्णुपत्नी असल्याचे सांगून तिरुपतीशी नाते जोडताना प्रसाद म्हणून लाडू दिला जातो आहे. त्याबाबतचे सर्व ऐतिहासिक पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे देवस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लाडूचा प्रसाद बंद करून खडीसाखर व फुटाण्यांचाच प्रसाद वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही समितीने केली आहे. लवकरच याबाबत सकारात्मक कार्यवाही होईल, असे दिलीप देसाई यांनी सांगितले.

दहा पुजारी आणि वाटण्या...
देवस्थान समितीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीत केवळ दहाच पुजाऱ्यांची नोंद आहे. त्यांनी वाटून घेतलेल्या वारांमुळे पुजाऱ्यांची संख्या जास्त दिसते. ज्येष्ठ श्रीपूजक बाबूराव ठाणेकर कन्या वारसाने पुजारी आहेत. मात्र, देवस्थानच्या कुठल्याच अधिकृत यादीत अजित ठाणेकर यांच्या नावाचा उल्लेख नाही. मग, त्यांनी पूजा बांधलीच कशी, असा सवाल दिलीप देसाई यांनी उपस्थित केला. मंदिरात प्रवेश करताना पोलिसांकडून भाविकांची सुरक्षेच्या कारणावरून झाडाझडती घेतली जाते. त्यांनी पुजाऱ्यांचे "आयडेंटिफिकेशन' कधी केले आहे का, असेही ते म्हणाले.

Web Title: kolhapur news proof for pujari deletion