मंत्रिमंडळापुढे महिनाअखेर पगारी पुजाऱ्यांसंबंधी प्रस्ताव - पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी ऑक्‍टोबरअखेर मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत केला जाणार आहे, अशी माहिती आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी ऑक्‍टोबरअखेर मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत केला जाणार आहे. कायदा करण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच तर प्रसंगी राज्यपालांच्या सहीचा अध्यादेश काढण्याचीही शासनाची तयारी आहे, अशी माहिती आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती सदस्यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘गुरुवारी (ता. १४) जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे सादर होईल. कायदा करण्यापूर्वी शासन देशभरातील मंदिरांचा अभ्यास करीत आहे. सर्वसमावेशक कायदा असेल. तो एकदा तयार झाला की त्याला न्यायालयात आव्हान दिले जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. पगारी पुजारी नेमताना त्या नेमणुका कशा कराव्यात, त्यांचे वेतन किती, शैक्षणिक पात्रता किती असावी या सर्व बाबींचा परिपूर्ण अभ्यास करूनच कायद्याचा मसुदा तयार होईल.’’ 

‘‘येत्या नवरात्रोत्सवात देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येतील. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी संघर्ष समितीने घ्यावी,’’ असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी केले. मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही सुरू नसल्याची तक्रार समितीने केली. त्याबाबत लगेचच सूचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवातील २९ व ३० सप्टेंबर हे वार श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्याकडे आहेत. त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार का? याबाबत प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

संघर्ष समिती सदस्य संजय पवार, विजय देवणे, बाबा पार्टे, इंद्रजित सावंत, दिलीप पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, शरद तांबट, राजेश लाटकर आदी या वेळी उपस्थित होते.

‘समितीनेही माहिती घ्यावी’
विधी व न्याय विभागाने स्थापन केलेली समिती कायद्याबाबत विविध माध्यमांतून अभ्यास करीत आहे. मी स्वतःही एक प्रस्ताव तयार केला असून, देशभरातील विविध मंदिरांतील पुजारी व्यवस्थापनाची माहिती मागवली आहे. संघर्ष समितीनेही महाराष्ट्रातील इतर मंदिरांतील अशी माहिती संकलित करून त्याचा प्रस्ताव द्यावा, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news proprosal of wage pujari in Ambabai Temple