इंधन दरवाढीचा काँग्रेसतर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  ‘इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘मोदी सरकारचा धिक्कार असो’चा नारा देत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौकात पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. बैलगाडीत मोटारसायकल ठेवून इंधन बचतीचा आता हाच मार्ग असल्याचे प्रतीकात्मक दाखवण्यात आले.

कोल्हापूर -  ‘इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘मोदी सरकारचा धिक्कार असो’चा नारा देत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौकात पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. बैलगाडीत मोटारसायकल ठेवून इंधन बचतीचा आता हाच मार्ग असल्याचे प्रतीकात्मक दाखवण्यात आले.

१ जुलै २०१७ ला पेट्रोल प्रती लिटर ६३ रुपये होते. १० सप्टेंबरपर्यंत ते ७६ रुपये झाले. गेल्या ७२ दिवसांत पेट्रोल दरात १६ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी जरा जरी या दरात वाढ झाली तर विरोधी पक्षांच्या असंतोषाला कंठ फुटायचा. परंतु, आज दोन महिन्यांत एवढी मोठी वाढ होऊनही सरकार गप्प आहे. या दरवाढीचा थेट परिणाम माणसांना लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तुंच्या दरवाढीवर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. 

मोदी सरकारच्या निषेधाबरोबरच ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महिला कार्यकर्त्या घरगुती गॅस सिंलिंडर घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या वेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी शिवाजी चौक परिसर दणाणून गेला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरला पाटील, ॲड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, किशोर खानविलकर, चंदा बेलेकर, डॉ. के. एन. पाटील, महमदशरीफ शेख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. 

काँग्रेसच्या नगरसेवकांची दांडी
पक्षाच्या वतीने आयोजित या आंदोलनातही गटबाजीचे दर्शन पाहायला मिळाले. महापालिकेतील काँग्रेसचा एकही विद्यमान नगरसेवक आंदोलनात दिसला नाही. महापालिकेत उपमहापौर, स्थायी समिती सभापती काँग्रेसचे आहेत; पण तेही या आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

Web Title: Kolhapur news Protest against fuel price hike