कंत्राटदार महासंघाची जीएसटी विरोधात निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - कंत्राटदार, ठेकेदार करीत असलेल्या कामांवर सरसकट १८ टक्के जीएसटी लादला आहे. चालू निविदा व चालू असलेल्या कामांमध्ये जीएसटी कराचा विचार केलेला नाही. इतका कर देणे कंत्राटदारांना परवडणार नाही. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

कोल्हापूर - कंत्राटदार, ठेकेदार करीत असलेल्या कामांवर सरसकट १८ टक्के जीएसटी लादला आहे. चालू निविदा व चालू असलेल्या कामांमध्ये जीएसटी कराचा विचार केलेला नाही. इतका कर देणे कंत्राटदारांना परवडणार नाही. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, की १ जुलैपासून ठेकेदारांवर सरसकट १८ टक्के जीएसटी लागू केला आहे. शासनाने हा कर व्हॅट, सेवाकर, एक्‍साईज कर व इतर करांचे एकत्रीकरण करून दर ठरविलेले आहेत. आतापर्यंत शासकीय इमारत, रस्ते, धरणे, कॅनॉल व इतर शेतीकामासाठी सेवा कर लागू नव्हता. त्यामुळे कंत्राटदारावर फक्त ‘व्हॅट’च लागू होता. आता ‘जीएसटी’मध्ये सेवा कर एकत्रित आल्याने एकत्रित दर जास्त होऊन १८ टक्के इतका झालेला आहे. हा कर अन्यायकारक झालेला आहे. ठेकेदारांची काही कामे १ जुलै २०१७ पूर्वीपासून सुरू आहेत. त्या कामांमध्ये फक्त ‘व्हॅट’ पकडलेला आहे.

पूर्वीच्या ‘व्हॅट’ची सरासरी फक्त पाच टक्के होती व जी कामे मजुरीची व माती खुदाईची आहेत, त्यांना ‘व्हॅट’चा बोजा नव्हता. तशा प्रकारचे जीएसटी आकारणे गरजेचे आहे. यापूर्वी शासकीय ठेकेदारांना सेवा कर नव्हता. सेवा कराची रक्कम काम करून घेणारा मालक देत होता. 

शासनाने हल्ली काही निविदा जाहीर केलेल्या आहेत. त्याच्या अंदाजपत्रकात ‘व्हॅट’ आकारला आहे. मात्र, टेंडरला ‘जीएसटी’ भरण्यासाठी अट घातली आहे. अंदाजपत्रक तयार करताना ‘जीएसटी’ची कोणत्याही प्रकारची तरतूद विचारात घेतलेली नाही, हे चुकीचे आहे. याचा विचार ‘व्हॅट’ऐवजी ‘जीएसटी’ची तरतूद करून अंदाजपत्रके तयार करूनच निविदा काढाव्यात, जोपर्यंत ‘जीएसटी’चा समावेश अंदाजपत्रकात केला जात नाही, तोपर्यंत सर्व निविदांवर बहिष्कार आणि चालू असलेली शासकीय, निमशासकीय व इतर कामे बंद ठेवण्याचा निर्णय आजपासून केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी महासचिव सुनील नागराळे, संजय खोत, किशोर खारगे, संजीव श्रेष्टी, प्रशांत देसाई, धीरज तिळंगणी, विक्रम नलवडे, अमित अधिक, कुणाल संसारे, मधुकर कदम, सागर घुमाई उपस्थित होते.

Web Title: kolhapur news Protest against the GST of the Contractor Mahasangh