पोलिसाची प्रवाशांना दमदाटी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कोल्हापूर - मुंबईला जाणारी शिवशाही बस बंद पडल्याने आज रात्री दहाच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांनी दुसरी शिवशाही बस रोखली. या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे असलेल्या पोलिस व त्याच्या नातेवाईकाने महिला व प्रवाशांना धक्काबुक्की करून दमदाटी केली.

कोल्हापूर - मुंबईला जाणारी शिवशाही बस बंद पडल्याने आज रात्री दहाच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांनी दुसरी शिवशाही बस रोखली. या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे असलेल्या पोलिस व त्याच्या नातेवाईकाने महिला व प्रवाशांना धक्काबुक्की करून दमदाटी केली.

पोलिसाचे कुटुंबीय त्या गाडीतून प्रवास करीत असल्याने त्याने ही दमदाटी केल्याचे प्रवाशांनी सांगितले. या प्रकारामुळे सुमारे पाऊण तास तणावाचे वातावरण बनले. अखेर स्थानकप्रमुखांसह चालक-वाहकांनी निमआराम बस पर्याय म्हणून दिल्यानंतर हा तणाव निवळला. मात्र साध्या वेशातील पोलिसाची मग्रुरी चर्चेत आली. या सर्व घटनेचा व्हिडिओ रात्रीच सर्वत्र व्हायरल झाला होता.

रात्री नऊच्या सुमारास मुंबईला जाणारी शिवशाही बस बंद पडली. त्यातील प्रवासी तेथेच उभे होते. दरम्यान, दहाच्या सुमारास दुसरी शिवशाही बस सोडण्यात येत होती. तेव्हा नऊच्या बसमधील प्रवाशांनी ती बस रोखली. प्रथम आमची गाडी सोडा, नंतर दहाची गाडी सोडा, असा आग्रह त्यांनी धरला. याचवेळी तेथे असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील साध्या वेशातील पोलिस आणि त्याच्या नातेवाईकाने गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना दमदाटी केली. तरीही प्रवाशांनी दहाची गाडी सोडायची नाही, असा आग्रह धरला. या वेळी पोलिस आणि त्याच्या नातेवाईकाने ‘बाजूला हो’ असा दम देत महिलांना आणि इतर तरुण प्रवाशांना दमदाटी करून बस सोडण्यास भाग पाडले.

जा कोणाच्या विरोधात तक्रार देणार द्या जा, अशा शब्दांत पोलिस प्रवाशांना दम देत होते. तेथे आलेल्या खाकी वर्दीतील पोलिसानेही नमतेपणा घेत साध्या ड्रेसवर असलेल्या पोलिसांना मूक पाठिंबा दिला. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले होते. या वेळी पोलिसाने महिलेलाही दमदाटी केली. सदरचा तरुण तर प्रवाशांना दम देऊन तेथून बाजूला जाण्यास सांगत होता. पोलिसाचे नातेवाईक दहाच्या गाडीत असल्याने त्याने ही दमदाटी केल्याचेही घटनास्थळावरून सांगण्यात आले.

दरम्यान, स्थानकप्रमुख तेथे आले, त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर शिवशाही बस सोडण्यात आली. आणि नऊच्या गाडीच्या प्रवाशांसाठी निमआराम (एशियाड) गाडीची व्यवस्था केली. प्रत्येकी ५० रुपये परत केले. काही प्रवाशांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. त्यांचा परताव्याचा प्रश्‍न पुन्हा पुढे आला. अखेर काही प्रवाशांनी मोबाईल हॅन्डसेटच्या स्क्रीनवर तिकीट दाखविले आणि हा प्रश्‍न सोडविला. पण, याचा व्हिडिओ कोणा जागरूक नागरिकाने केल्याने पोलिसांनी नातेवाईकांसाठी केलेली मग्रुरी जनतेसमोर आली.

Web Title: Kolhapur News quareel between police and passanger