इचलकरंजी पालिकेत हाणामारीचा प्रकार

पंडीत कोंडेकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

इचलकरंजी - इचलकरंजी नगरपालिकेत आज नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहाय्यक उमाकांत दाभोळे व नगरसेवक सागर चाळके यांच्यात हाणामारी झाली.

इचलकरंजी - इचलकरंजी नगरपालिकेत आज नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहाय्यक उमाकांत दाभोळे व नगरसेवक सागर चाळके यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर चाळके समर्थकांनी दाभोळे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये दाभोळे यांच्यासह नगरसेवक चाळके यांचे पूत्र मंथन चाळके जखमी झाले.

दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकाराने पालिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. चाळके व दाभोळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 
शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून काम केलेल्या एका मक्तेदाराच्या बिलाच्या फाईलवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी करण्याबाबत नगरसेवक चाळके यांचा आग्रह होता. पण गेल्या पाच - सहा दिवसांपासून संबंधित फाईलवर स्वाक्षरी झाली नव्हती. काल सोमवारी याबाबत नगरसेवक चाळके यांना नगराध्यक्षांच्या दालनात येवून जाब विचारला होता. त्यावेळी वादवादी झाली होती. मात्र एका नगरसेवकांने यामध्ये मध्यस्थी केली होती.

आज दुसऱ्या दिवशी ही संबंधित मक्तेदाराच्या बिलाच्या फाईलवर स्वाक्षरी झाली नाही. त्यामुळे नगरसेवक चाळके संतप्त झाले. त्यांनी याबाबत नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहायक दाभोळे यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी होवून हाणामारी झाली. यामध्ये नगरसेवक चाळके यांचा शर्ट फाटला. कांही वेळानंतर या घटनेचे पडसाद उमटले. दाभोळे हे पालिकेतून बाहेर पडत असतांना चाळके समर्थकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या झटापटीत दगड लागल्याने चाळके यांचे पूत्र मंथन यांच्या डोकीत गंभीर इजा झाली. या प्रकाराने पालिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 

Web Title: Kolhapur News quarrel in Ichalkaraji Palika