कोल्हापूरची ऊर्जा इतरांनाही द्या.. - आर. माधवन

कोल्हापूरची ऊर्जा इतरांनाही द्या.. - आर. माधवन

कोल्हापूर -  ‘‘तरुणांनो, प्रत्येक बदलाची सुरवात ही छोट्या बदलाने होते. दुसऱ्यांवर विसंबून न राहता स्वत:त बदल घडवा. जो बदल तुमच्यात घडेल, त्याचा परिणाम या शहरावर होईल. कोल्हापूर हे ऊर्जामय शहर आहे. या शहरातील ऊर्जा दुसऱ्यांना देण्यासाठी पुढाकार घ्या,’’ असा कानमंत्र प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांनी येथे दिला.

‘कम्पॅशन २४’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे दोन हजार विद्यार्थिनींना दत्तक घेण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते. लोककला केंद्रात कार्यक्रम झाला. 

‘कसं काय कोल्हापूर?’ अशी जिव्हाळ्याने विचारणा करीत माधवन यांनी ‘तरुणाईने काय केले पाहिजे,’ याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘मी इंजिनिअर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. एका महाविद्यालय परिसरात मी व वडील गेलो होतो. समोरून चार मुली स्कर्टमध्ये पाहताच वडिलांनी आपला निर्णय बदलला. त्यानंतर माझ्या शिक्षणासाठी आम्ही कोल्हापुरात आलो. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर रिक्षात बसलो. रिक्षावाल्याने महालक्ष्मीचे गीत लावले. त्याचवेळी वडिलांनी शिक्षणासाठी हेच चांगले शहर असल्याचे ठरवून टाकले आणि माझा राजाराम महाविद्यालयातील प्रवेश निश्‍चित झाला.’’ 

‘‘कोल्हापुरात असताना मला प्रत्येकाने मदत केली. कोल्हापूरकरांकडून मी खूप काही शिकलो’’ अशी आठवण सांगताना माधवन म्हणाले, ‘‘येथील लोक उदार आणि नम्र आहेत. मात्र, आता जग ज्या वेगाने बदलत आहे, तो बदल आत्मसात करायला पुढे या. तुमच्यात खूप शक्ती आहे. ही शक्ती विधायक मार्गाला लावून सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी योगदान द्या.’’ 

श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन जीवनात माधवन तळपता तारा होते. ते माझा आयडॉल होते. वसतिगृहात असताना ते एक स्वप्नाळू तरुण होते. ते आम्हाला इंग्रजी शिकवायचा प्रयत्न करायचे. त्यांनी मला आयुष्याच्या ‘ब्ल्यू प्रिंट’मध्ये उनाडपणा येतो का, असा प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नाने मी गंभीर झालो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील ‘ब्ल्यू प्रिंट’ कमवायची वेळ हीच आहे. नकारार्थी लोकांपासून दूर राहा आणि स्वत:मधील आत्मविश्‍वासावर फुंकर घाला.’’ 

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘आयुष्यात कोण आयडॉल असावे, हे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर, विवेकानंद यांच्यासारखे आयडॉल हवेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २२ टक्के मुली शिक्षणापासून वंचित आहेत. हुंड्यातून स्त्रीभ्रूण हत्या होत आहे, हे लक्षात घेऊन तुमच्या भविष्याची वाटचाल कशी हवी, हे निश्‍चित करा.’’

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचेही भाषण झाले. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कौस्तुभ मराठे, प्रवीण घाटगे, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते. कम्पॅशनचे प्रमुख मिलिंद धोंड यांनी स्वागत केले. 

‘होय मी स्टडी रूममध्ये येत होतो...’
मिलिंद धोंड यांनी ते व माधवन शिवाजी विद्यापीठात अभ्यासाला येत होते, असा उल्लेख केला. तो धागा पकडत, माधवन म्हणाले, ‘‘मी राजाराम महाविद्यालयात असताना विद्यापीठातील स्टडी रूममध्ये येत होतो, हे खरे आहे. मात्र, अभ्यासासाठी नव्हे, तर एका मुलीसाठी. तीच माझी पत्नी झाली. सुरवातीला ती महालक्ष्मी होती, आता ती दुर्गा झाली आहे.’’ त्यांच्या या वक्‍तव्यावर लोककला केंद्रात शिट्यांचा आवाज घुमला. 

तरुणाईची तुडुंब गर्दी
माधवन येणार असल्याने लोककला केंद्रात तरुणाईने तुडुंब गर्दी केली. ते स्टेजवर येताच अनेकांनी मोबाईलद्वारे त्यांची छायाचित्रे टिपली. काहींनी त्यांच्याबरोबर स्टेजवरच सेल्फी घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com