काँग्रेस-राष्ट्रवादीची होणार आघाडी  - राधाकृष्ण विखे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कोल्हापूर - आगामी सर्व निवडणुकांत राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्‍चित होईल. आघाडीबाबतचे सर्व मुद्दे संपलेले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर - आगामी सर्व निवडणुकांत राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्‍चित होईल. आघाडीबाबतचे सर्व मुद्दे संपलेले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. 

दरम्यान, काँग्रेसतर्फे राज्य सरकारविरोधातील परिवर्तन यात्रा कोल्हापुरातून जून महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन आहे. त्यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी होकार देताच तारीख व ठिकाण निश्‍चित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, पोलिसांना निर्णय घ्यायचे अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे पोलिस खाते शासनाच्या हातचे बाहुले बनले आहे, राज्यात सरकारविरोधात वातावरण आहे. सरकारची अनेक प्रकरणे आम्ही विरोधकांनी बाहेर काढली. त्यातून बदललेल्या वातावरणाचा अंदाज आल्याने भाजपने आता ‘एकला चलो रे’च्या ऐवजी शिवसेनेकडे युतीसाठी हात पसरले आहेत.

- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते

गुंडगिरीला भाजप सरकारकडून आश्रय दिला जात असून, अहमदनगर येथील शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांचा झालेला खून हा राजकीय पूर्ववैमनस्यातून झाला असला तरी तो निषेधार्हच आहे; पण राज्यात गुन्हेगारी वाढली असून, सरकारला त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 
एका कार्यक्रमासाठी श्री. विखे-पाटील कोल्हापुरात आले होते.

शेट्टींना कळून चुकले 
सध्याचे राज्य व केंद्र सरकार हे शेतकरी हिताचे निर्णय घेऊच शकत नाही, हे खासदार राजू शेट्टी यांनाही कळून चुकले आहे. काँग्रेसला शेतकरी प्रश्‍नाची चांगली जाण असल्याचे श्री. शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आगामी सर्वच निवडणुकांत श्री. शेट्टी हे काँग्रेससोबत असतील, असेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. 

यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘नगरमधील घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही; पण यात राजकीय सूडबुद्धीने कारवाई होऊ नये. मुळात ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली आहे. त्याचा निषेधच केला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे. राजकीय आकसापोटी कारवाई होण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘क्‍लीन चिट’ची एक खिडकी योजना सुरू केल्याने हा संशय वाटतो.’ 

राणे मोठे नेते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. ते मोठे नेते असल्याने त्यांच्या या निर्णयावर मी भाष्य करणार नाही, असे सांगतू विखे-पाटील यांनी श्री. राणे यांच्याविषयी बोलण्यास नकार दिला.

Web Title: Kolhapur News Radhakrushn Vikhe Patil comment