ऊस परिषद घेण्याचा शेट्टींना अधिकार नाही - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

खासदार राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षीपेक्षा 80 टक्के एफआरपी दिली, तरी चालेल म्हणून सांगितले, त्या शेट्टींना ऊस परिषद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला शेतकरी संघटनेनेचे रघुनाथदादा पाटील यांनी लगावला. 

कोल्हापूर -  शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी बोगस आहे, कर्जमाफीच्या याच कारभारामुळे लाखो शेतकऱ्यांत असंतोष आहे. सरकारला याचा जाब द्यावा लागले. 30 ऑक्‍टोबरला साखर संकुल येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेतली जाणार आहे, मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षीपेक्षा 80 टक्के एफआरपी दिली, तरी चालेल म्हणून सांगितले, त्या शेट्टींना ऊस परिषद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला शेतकरी संघटनेनेचे रघुनाथदादा पाटील यांनी लगावला.

भारतीय शेतकरी कामकार पक्ष कार्यालयात शिक्षणाचे खासगीकरण' या विषायावर चर्चा झाली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
रघुनाथदादा पाटील म्हणाले, "शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याचा जाब शेतकऱ्यांना द्यावा लागेल. बोगस कर्जमाफीविरुद्ध अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल. सुमारे दोनशे ठिकाणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध बळिराजा मूक मोर्चातर्फे फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर 302 कलमाखाली जबाबदार धरून खुनाचे गुन्हे नोंद केले. पोलिसांनी यावर कारवाई केली नाही, तर मात्र यावर कोर्टात दाद मागितली जाईल. 

उसाच्या दरात राज्यातील शेतकऱ्यांना फसवले आहे. गुजरातमध्ये प्रतिटन उसाला 4441 रुपये दर दिला जातो. यापेक्षाही उत्तर प्रदेशात चांगला दर दिला. महाराष्ट्रात आता एफआरपीपेक्षा दर न घेता साखरेच्या दराच्या तुलनेत उसाचा दर घेणार आहे. या पार्श्‍वभूवीर या वर्षी पहिला हप्ता 3500 हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. 

सदाभाऊंनी शेतकऱ्यांचे नुकसान केले 
सोयाबीन पिकांवरून सध्या लक्षात येत आहे की सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले. उडीद, तूर, सोयाबीन ही सर्व पिके चांगली आहेत; पण आधारभूत किंमत जाहीर करून रिकामे होऊन चालत नाही. खरेदी केंद्राचे उद्‌घाटन झाले, पण ते सुरळीत सुरू नाहीत. खरेदी केंद्र सुरू हवेत, शेतकऱ्यांकडे तयार झालेला माल कोणी 2200 रुपयालाही खरेदी करायला तयार नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही नामुष्कीची गोष्ट आहे. 

Web Title: Kolhapur News Raghunathadada Patil Press