इचलकरंजीत कुमारी मातांच्या अर्भकांची विक्री

राजेंद्र होळकर
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - येथील जवाहरनगरातील लिगाडे मळ्यातील एका होमिओपॅथिक डॉक्‍टरच्या रुग्णालयावर आज केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने (कारा) छापा टाकला. त्या रुग्णालयामध्ये कुमारी मातांची बेकायदेशीरपणे प्रसूती केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.​

इचलकरंजी - येथील जवाहरनगरातील लिगाडे मळ्यातील एका होमिओपॅथिक डॉक्‍टरच्या रुग्णालयावर आज केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने (कारा) छापा टाकला. त्या रुग्णालयामध्ये कुमारी मातांची बेकायदेशीरपणे प्रसूती केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

संबंधित कुमारी मातांना सुमारे दोन लाख रुपयांची लालूच दाखवून त्यांच्याकडून चार ते पाच दिवसांच्या नवजात अर्भकाची सुमारे आठ ते दहा लाख रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष रामचंद्र रेड्डी, सदस्य शिवानंद डंबळ, जिल्हा महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे यांनी पत्रकारांना दिली.
हा गंभीर प्रकार पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उघडकीस आला आहे. या रॅकेटची पाळेमुळे संपूर्ण राज्यासह छत्तीसगडपर्यंत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यामध्ये अनेक बड्या डॉक्‍टरांचा सहभाग असावा, असा संशयही केंद्रीय पथकाने व्यक्त केला आहे.

संबंधित रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दोन कुमारी मातांची प्रसूती करण्यात आली. त्या नवजात अर्भकांची मुंबई व छत्तीसगड येथे विक्री करण्यात आली आहे. यामध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे. मुलगा मुंबईमध्ये तर मुलीची छत्तीसगड येथे विक्री केली आहे. मुलग्याची १० लाख तर मुलीची सुमारे ७ ते ८ लाख रुपयांना विक्री करण्यात आली. रुग्णालयाच्या डॉक्‍टरने संबंधित कुमारी मातेला नवजात अर्भक विक्रीसाठी दिल्याबद्दल सुमारे २ लाख रुपये दिल्याचीही माहिती रामचंद्र रेड्डी, शिवानंद डंबळ, प्रियदर्शनी चोरगे यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. अरुण पाटील, त्याची पत्नी उज्ज्वला व एका कुमारी मातेला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

या बाबत केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी - येथील जवाहरनगरातील लिगाडे मळ्यामध्ये होमिओपॅथीची पदवी घेतलेल्या डॉ. अरुण पाटील याचे जनरल सर्जिकल व मॅटर्निटी या नावाचे रुग्णालय आहे. रुग्णालयामध्ये प्रसूतीपूर्व गर्भतपासणी यंत्राची (स्कॅनिंग युनिट) सुविधा आहे. या यंत्रावर रेडिओलॉजिस्टची नेमणूक न करता बेकायदा गर्भलिंग तपासणी करण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे.

डॉ. अरुण पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना देत नव्हता. उलट संबंधित पीडित अल्पवयीन मुलींना आश्रय देऊन त्यांची प्रसूतीपर्यंत रुग्णालयामध्ये राहण्याची व्यवस्था करीत होता. अत्याचारपीडित मुलीची बेकायदेशीरपणे गर्भतपासणी केली जात होती. त्याद्वारे मुलगा आहे की मुलगी हे पाहिले जात होते. प्रसूतीनंतर चार ते पाच दिवसांचे नवजात अर्भक कुमारी मातेकडून सुमारे दोन लाख रुपयांना विकत घेण्यात येत होते. ते अर्भक अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना चढ्या दराने विकले जात होते.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे (कारा) अध्यक्ष रामचंद्र रेड्डी, शिवानंद डंबळ, श्रीनुजी, प्रियदर्शनी चोरगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते, स्त्रीरोगतज्ज्ञ प्रमिला जरग (कोल्हापूर), माजी लेखापरीक्षक के. के. कांबळे, सुनील शिंदे, अभिमन्यू कुरणे आदींच्या पथकाने रुग्णालयावर छापा टाकला. या वेळी रुग्णालयामध्ये नुकतीच प्रसूत झालेली एक कुमारी माता आढळून आली. तिच्याकडे पथकाने कसून चौकशी केली असता तिचे स्त्री जातीचे नवजात अर्भक छत्तीसगड येथे विकल्याचे समोर आले. त्यावरून पथकाने संबंधित कुमारी मातेला ताब्यात घेतले.

डॉ. पाटील याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. यावेळी डॉ. पाटील याने हॉस्पिटलमध्ये कुमारी मातांची प्रसूती करतो, असे सांगून मी एक चांगले काम करतो आहे. गरीब मुलींना मोफत औषध देतो. त्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था करतो. प्रसूतीही मोफत करतो. अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना त्यांचे नवजात अर्भक देतो. यावेळी त्या कुमारी मातेच्या आणि दत्तक घेणाऱ्या व्यक्तीमध्ये जो परस्पर व्यवहार होतो, तो मला माहिती नाही, असे सांगितले.

पथकाने डॉ. पाटील याच्या हॉस्पिटलमधील प्रसूतीपूर्व गर्भतपासणी यंत्र, काही कागदपत्रे जप्त केली आहेत. रात्री उशिरा अरुण पाटील, पत्नी उज्ज्वला पाटील, कुमारी माता यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. पाटील हॉस्पिटलमध्ये दिवसाला चार ते सहा प्रसूती करीत असे; पण त्यांची कागदपत्रे ठेवत नसे, अशी बाबही निदर्शनास आल्याचे केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कुमारी मातांची बेकायदेशीरपणे प्रसूती करून त्यांच्या नवजात अर्भकांची दत्तकच्या गोंडस नावाखाली विक्री केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

आईच्या प्रेमाचा हक्क हिरावला
अत्याचारपीडित कुमारी मातेच्या प्रसूतीनंतर नवजात अर्भकांची आर्थिक लोभापायी विक्री होत असे. अर्भकावरील आईच्या प्रेमाचा हक्क हिरावून घेतल्याचे वास्तव डॉ. अरुण पाटील याच्या रुग्णालयावरील छाप्यामुळे समोर आले आहे.

डॉक्‍टरांच्या कर्तव्याला तिलांजली
डॉ. अरुण पाटीलच्या रुग्णालयामध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या कुमारी माता उपचारासाठी दाखल होत असे. त्यावेळी त्याने या प्रकरणाची माहिती त्वरित पोलिसांना देणे आवश्‍यक होते; पण त्यांनी कर्तव्याला तिलांजली दिल्याचा प्रकार या कारवाईने समोर आला.

दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी भेट दिली. त्यांनी डॉ. अरुण पाटील याची कसून चौकशी केली. तसेच या प्रकरणातील तपासाच्या अनुषंगाने आवश्‍यक त्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे व शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश पवार व इतर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

मुंबईतील एका डॉक्‍टरचा सहभाग ?
केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने केलेल्या चौकशीत या प्रकरणात मुंबईतील एका डॉक्‍टरचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी डॉ. पाटील याचा मोबाईल जप्त केला. त्या मोबाईलच्या माध्यमातून पथकाने संबंधित मुंबईच्या डॉक्‍टरचा शोध सुरू केला आहे.

मनेका गांधी यांच्याकडून कारवाईचे आदेश
एका नवजात अर्भकाच्या विक्री प्रकरणाचे एक छायाचित्र केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना अज्ञाताकडून पाठविण्यात आले होते. या छायाचित्रात डॉ. पाटील दाम्पत्य, संबंधित कुमारी माता, अर्भक विकत घेणारे दाम्पत्य, अन्य एक व्यक्ती अशा सहा व्यक्ती आहेत. या छायाचित्रावरून मनेका गांधी यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय दत्तक प्रक्रिया पथकाला (कारा) दिले होते. त्यावरून या पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून डॉ. अरुण पाटील याच्यावर पाळत ठेवली होती. 

कोरोचीच्या अनाथालयातून १४ मुलांची सुटका

कोरोची येथील चव्हाण मळ्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर संतोषीमाता अनाथालयावरही केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने (कारा) छापा टाकला. या अनाथालयामधून ‘कारा’च्या पथकाने १४ मुलांची सुटका केली. सुटका केलेल्या मुलांची कोल्हापुरातील बालसुधारगृहामध्ये रवानगी केली. छाप्यावेळी अनाथालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मंडळींसह परिसरातील नागरिकांमध्ये आणि ‘कारा’च्या अधिकाऱ्यांत वादावादी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला. दरम्यान, या अनाथालयावर ‘कारा’ने छापा टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. सन २००९ मध्ये छाप्यावेळी आढळून आलेल्या एका मुलाचे दत्तक प्रकरण मोठे गाजले होते. 

केंद्रीय पथकाला संतोषीमाता अनाथालय बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ‘कारा’चे अध्यक्ष रामचंद्र रेड्डी, सदस्य शिवानंद डंबळ, श्री नुजी यांच्यासह पथकाने अनाथालयावर सकाळी सातच्या सुमारास छापा टाकला. ही माहिती समजताच अनाथालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दाम्पत्यासह परिसरातील नागरिकांनी अनाथालयाकडे धाव घेतली. अनाथालय लोकांच्या मदतीने सुरू असून, येथे गरीब कुटुंबातील अनाथ मुले असल्याचे सांगितले.

याच दरम्यान अनाथालयाचे व्यवस्थापन पाहणारे दाम्पत्य व परिसरातील नागरिकांनी पथकातील अधिकाऱ्यांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे तणाव वाढू लागला. याची माहिती पोलिसांना समजताच ते त्वरित घटनास्थळी आले. त्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पथकाने कारवाई करीत १४ मुलांची सुटका केली. या अनाथालयावर सन २००८, २००९ आणि आज असे तीन वेळा छापे पडले आहेत.

Web Title: Kolhapur News raid on Dr Arun Patil hospital