अर्भक विक्री प्रकरणातील डॉक्‍टरला सात दिवसांची कोठडी

अर्भक विक्री प्रकरणातील डॉक्‍टरला सात दिवसांची कोठडी

इचलकरंजी -  कुमारी मातांच्या अर्भकांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील होमिओपॅथी डॉ. अरुण भूपाल पाटील (वय ५७, मूळ रा. आळते, ता. हातकणंगले, सध्या रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याला अटक केली. त्याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली. डॉ. पाटील जवाहरनगरातील लिगाडे मळ्यामधील ‘जनरल सर्जिकल व मॅटर्निटी’चा प्रमुख आहे. दरम्यान या प्रकाराबाबत शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी सकाळी डॉ. पाटील याची पत्नी उज्ज्वला हिला ताब्यात घेण्यासाठी बंगल्यावर छापा टाकला; पण तिच्यासह अन्य नातेवाईक बंगल्याला कुलूप लावून पसार झाल्याचे पोलिसांना आढळले. नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाच्या (कारा) पथकाने डॉ. पाटील याचे रुग्णालय सील केले. शहरातील दोन ठिकाणच्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये यंत्रांची तपासणी केली. या कारवाईत वरिष्ठ पोलिस 
अधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रमिला जरग (कोल्हापूर) असे स्थानिक पथकही सहभागी होते. 

पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची एक बैठकही झाली. दरम्यान सकाळी स्थानिक पथक इचलकरंजीत आले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. डॉ. पाटील याची तब्बल दीड तासाहून अधिक काळ कसून चौकशी केली.

उपअधीक्षक विनायक नरळे, निरीक्षक सतीश पवार व पथकाने डॉ. पाटील याला घेऊन त्याच्या जवाहरनगरातील लिगाडे मळ्यामधील ‘जनरल सर्जिकल व मॅटर्निटी’ची झडती घेतली. पथकाने तेथून कागदपत्रे जप्त केली. प्रसूतीच्या नोंदीमध्ये आणि जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याची माहिती प्रियदर्शनी चोरगे व पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.

केंद्रीय पथकाने सोमवारी (ता. ६) या रुग्णालयावर छापा टाकला. त्यावेळी एक पीडित अल्पवयीन मुलगी आढळली होती. तिची डॉ. पाटील याने याच रुग्णालयात प्रसूती केली. डॉ. पाटील, त्याची पत्नी उज्ज्वला, अपत्य घेणारे अनोळखी पालक यांनी संगनमताने संबंधित कुमारी मातेला पैशाचे आमिष दाखविले आणि अर्भकाची छत्तीसगडमध्ये विक्री केली आहे. तेथे जाऊन अर्भक ताब्यात घ्यायचे आहे. बेकायदेशीर प्रक्रिया करणाऱ्या संबंधित पालकांना अटक करायची आहे, त्यासाठी डॉ. पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. त्यानंतर डॉ. पाटीलला सात दिवसांची कोठडी देण्यात आली.

डॉक्‍टरला बांगड्यांचा आहेर
डॉ. पाटीलने केलेल्या कृत्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने जाहीर निषेध केला. पोलिसांनी डॉ. पाटीलला न्यायालयात आणले, त्यावेळी महिला सेनेने पाटीलला बांगड्यांचा आहेर दाखवित निषेध व्यक्त केला. महिलांनी शिवराळ भाषेत घोषणा देऊन न्यायालयाचा परिसर दणाणून सोडला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष सिंधूताई शिंदे, सोनाली आडेकर, सुलोचना घाटगे, अंजली बोरगले, मनसे शहरप्रमुख राजेंद्र निकम आदींचा सहभाग होता.

जत पोलिसांकडे गुन्हा वर्ग
दरम्यान, जत (जि. सांगली) तालुक्‍यातील एकाने अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आज शून्य कलमाने गुन्हा नोंद करून, पुढील चौकशीसाठी जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.
चौकट

डॉक्‍टर महिलेची चौकशी
डॉ. पाटीलच्या रुग्णालयातून मुंबई येथील एका डॉक्‍टर दाम्पत्याला काही महिन्यांपूर्वी नवजात अर्भक दत्तक देण्यात आले. त्या दत्तक प्रकरणी शहरातील एका महिला डॉक्‍टरने मध्यस्थी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित महिला डॉक्‍टरची आज पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली; पण याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

संबंधीत बातम्या -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com