अंतिम सर्वेक्षणानंतरच ठरणार रेल्वेमार्ग 

निखिल पंडितराव 
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन नुकतेच झाले. भूमिपूजन झाले असले तरी अद्याप रेल्वेमार्ग निश्‍चित केलेला नाही. कोल्हापूर वैभववाडीला कोणत्या मार्गाने जोडायचे याचे अंतिम सर्वेक्षण होणार आहे. अंतिम सर्वेक्षणानंतरच हा मार्ग निश्‍चित होईल. त्यानंतर जमीन संपादन व इतर प्रक्रिया सुरू होईल. ही रेल्वे पाच वर्षांत धावण्याचे नियोजन असले तरी जमीन संपादनावेळी येणारे अडथळे पाहता हा कालावधी वाढण्याची शक्‍यता आहे. 1930 ते 40 दरम्यान कोल्हापूर कोकणशी जोडण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन नुकतेच झाले. भूमिपूजन झाले असले तरी अद्याप रेल्वेमार्ग निश्‍चित केलेला नाही. कोल्हापूर वैभववाडीला कोणत्या मार्गाने जोडायचे याचे अंतिम सर्वेक्षण होणार आहे. अंतिम सर्वेक्षणानंतरच हा मार्ग निश्‍चित होईल. त्यानंतर जमीन संपादन व इतर प्रक्रिया सुरू होईल. ही रेल्वे पाच वर्षांत धावण्याचे नियोजन असले तरी जमीन संपादनावेळी येणारे अडथळे पाहता हा कालावधी वाढण्याची शक्‍यता आहे. 1930 ते 40 दरम्यान कोल्हापूर कोकणशी जोडण्याचा प्रस्ताव तयार केला होता. कोल्हापूर कोकणशी रेल्वेने जोडल्यास व्यापार वृद्धीसाठी फायदेशीर ठरणार हे गृहीत धरून नियोजन सुरू केले होते; परंतु काही कारणाने या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता भूमिपूजन तर झाले आहे, प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी लांबचा टप्पा गाठावा लागणार आहे. 

पहिला प्रयत्न 90 वर्षांपूर्वी 
कोल्हापूर कोकणशी रेल्वेमार्गाने जोडण्याचा विचार 90 वर्षांपूर्वी झाला होता. 1930 ते 1940 च्या दरम्यान याबाबत विचार पुढे आल्यानंतर त्यानुसार मार्गाची पाहणीही केली होती. रेल्वेमार्गही निश्‍चित झाला होता; परंतु काही कारणांमुळे त्यावेळी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. 

पाच वेळा सर्वेक्षण 
कोकणला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी आत्तापर्यंत 5 वेळा सर्वेक्षण झाले आहे. प्रारंभी कोल्हापूर-वैभववाडी-रत्नागिरी मार्गाचे सर्वेक्षण झाले. त्यावेळी हा मार्ग 205 किलोमीटरचा होता. त्यानंतर कोल्हापूर वैभववाडीला जोडण्यासाठीचा विचार पुढे आला आणि त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. या मार्गामुळे रेल्वेचा खर्च 50 टक्के कमी होणार होता. त्यामुळे या मार्गाचे पाच वेळा सर्वेक्षण करण्यात आले. 

जमीन संपादन कळीचा मुद्दा 
अंतिम सर्वेक्षणानंतर रेल्वेमार्ग कोठून जाणार हे नक्की होईल. त्यानंतर जमीन संपादन करणे मुद्दा महत्त्वाचा असेल. जमीन संपादन राज्य शासनाने करून द्यायचे आहे. त्यासाठी रेल्वेने महाराष्ट्र डेव्हलपमेंट कार्पोरेशनची स्थापना केली आहे. यामार्फत जमीन संपादन प्रक्रिया राबविली जाईल; परंतु जमिनीचा प्रश्‍न आल्यानंतर त्यामध्ये लोकप्रतिनिधींपासून सगळ्यांची मते जाणून घेतली जातील. रेल्वेमार्गासाठी साधारणपणे 30 मीटर जमीन लागते. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी 10 मीटर जमीन सोडावी लागते. त्यामुळे कोणाची जमीन देणार, कशी घेणार यावर सर्व अवलंबून आहे. 

पुर्णत्वासाठी दहा वर्षे? 
सर्वेक्षण, जमीन संपादन आणि इतर प्रश्‍न पाहिल्यास कोल्हापूर-वैभवाडी रेल्वे प्रत्यक्ष धावण्यासाठी किमान 8 ते 10 वर्षे लागण्याची शक्‍यता आहे. पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा नियम असला तरी प्रत्यक्षात हा कालावधी वाढणार आहे. 

कोल्हापूर-वैभवाडी रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण आता होईल, त्यानंतर नेमका मार्ग निश्‍चित होईल. त्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होईल. राज्य शासनाने पुढाकार घेऊन जमीन संपादन करून द्यायचे आहे. त्यामुळे साहजिकच हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी राज्य शासनाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. 
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, पुणे 

कोल्हापूर कोकणला जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत त्याचा आढावा घेऊन पाठपुरावा केला जाईल. रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण, जमीन संपादन यासाठीही पाठपुरावा करू. 
- समीर शेठ, सदस्य, रेल्वे प्रवासी संघटना कोल्हापूर 

यापूर्वीचे सर्वेक्षण 
वैभववाडी स्थानक ते सोनाळी - कुसूर - उंबर्डे - मांगवली - उपळे - मौदै - सैतवडे - उतलवाडी - खोकुर्ले - कळे - कोपार्डे - भुये - कसबा बावडा - रेल्वे गुडस्‌ मार्केट यार्ड असा रेल्वेमार्ग सुचवला होता. मुंबई येथील जे. पी. इंजिनिअरिंगने हे सर्वेक्षण केले होते. गुगल मॅप व आधुनिक मशीनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात आले. या रेल्वेमार्गात वनखात्याची जमीन येत नाही. या सर्वेक्षणानुसार हा मार्ग अंदाजे 100 किलोमीटरचा आहे. मार्गात चार ते पाच बोगदे असतील. याशिवाय मार्गावर पाचहून अधिक स्थानके असतील. तसेच तीन ते चार मोठे पूलही बांधावे लागणार आहेत. तालुक्‍यात एक स्थानकही असण्याची शक्‍यता आहे. 

अद्याप अंतिम मार्ग अनिश्‍चित 
सर्वेक्षण झाले, निधी मंजूर झाला आणि आता या रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही झाले असले तरी रेल्वे कोणत्या मार्गाने धावणार हे आता अंतिम सर्वेक्षण झाल्यानंतरच निश्‍चित होईल. सध्या केवळ कोल्हापूर - मार्केट यार्ड - वळीवडे - शिवाजी विद्यापीठ मार्गे गारगोटी रस्ता रोड मार्गे जोडला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे; परंतु नेमक्‍या कोणत्या मार्गाने रेल्वे धावणार हे अंतिम सर्वेक्षणानंतरच स्पष्ट होईल. अंतिम सर्वेक्षण थोड्या दिवसांत सुरू होईल व दिवाळीनंतर किंवा डिसेंबर महिन्यात ते पूर्ण होईल. या अंतिम सर्वेक्षणानंतरच मार्ग निश्‍चित होईल. यामध्ये नदी, नाले, रस्ते, बोगदे किती, खासगी, सरकारी जमीन किती अशी सगळी सविस्तर माहिती असेल. 

Web Title: kolhapur news railway